वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) यांनी व्हाईट हाऊसमध्ये कोविड19 (Covid-19) लसीचा बुस्टर डोस घेतला. आरोग्य अधिकाऱ्यांनी बुस्टर डोसला मंजुरी दिल्यानंतर बायडन यांनी फायझर लसीचा बुस्टर डोस घेतला. कोविड लसीचे दोन डोस घेतल्यानतंर बुस्टर डोस दिला जातो. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी बुस्टर डोस प्रभावी ठरेल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. (US President Joe Biden gets Covid-19 booster shot)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना साथीला पराभूत करण्यासाठी, आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी, शाळा सुरु करण्यासाठी तसंच देशाची अर्थव्यवस्था मजबूत बनवण्यासाठी प्रत्येकाने लस घ्यायला हवी असं आवाहन जो बायडन यांनी केलं आहे. आपलं आणि आपल्या जवळच्या लोकांचे जीवन वाचवण्यासाठी बूस्टर डोस घ्यावा असं आवाहनही बायडन यांनी केलं आहे.


बायडन यांनी अध्यक्ष होण्यापूर्वी जानेवारीमध्ये कोविड-19 लसीचे दोन्ही डोस घेतले होते. लस घेतल्यानंतर कोणतेही दुष्परिणाम जाणवले नसल्याचं बायडन यांनी म्हटलं आहे. अमेरिकेत 65 वर्षांवरील व्यक्तीला फायझर लसीचा बुस्टर डोस दिला जाऊ शकतो. बायडन यांचं वय 78 आहे. 


बुस्टर डोस महत्त्वाचा असल्याचं बायडन यांनी म्हटलं आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण होणं गरजेचं आहे. अमेरिकेत 77 टक्क्यांपेक्षा जास्त प्रौढ व्यक्तींनी कमीतकमी कोरोना प्रतिबंधक लसीचा एक डोस घेतला आहे. तर 23 टक्के लोकांनी अजूनही लस घेतलेली नाही. जानेवारी, फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये तुम्ही फायझर लस घेतली असेल आणि तुमचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला बूस्टर डोस मिळू शकतो, असं बायडन यांनी म्हटलं आहे. 


अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने गेल्या आठवड्यात 65 आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी, गंभीर आजाराचा जास्त धोका असलेल्या लोकांसाठी  आपत्कालीन परिस्थितीत फायझरच्या कोविड -19 लसीचा बूस्टर डोस घेण्यास मंजूरी दिली आहे.