वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये अवघ्या काही तासांत सत्तांतर होतं आहे. जो बायडेन अध्यक्षपदाची शपथ घेणार असून कमला हॅरीस या पहिल्या महिला उपाध्यक्ष होणार आहेत. हॅरीस या उपाध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या भारतीय आणि आफ्रिकनवंशीय देखील आहेत. मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधून गाशा गुंडाळला आहे. अध्यक्ष या नात्यानं लष्कराकडून शेवटची मानवंदना स्वीकारून ते एअरफोर्स वनमधून फ्लोरिडाकडे रवाना झाले आहेत. आजच्या शपथविधीसाठी राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहर पोलिसांच्या जोडीला शहरात तब्बल 25 हजार नॅशनल गार्डची सुरक्षा ठेवण्यात आली आहे. ट्रम्प समर्थकांनी कॅपिटॉल हिलवर केलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पेनसिल्वेनिया अव्हेन्यू परिसरात सामान्य नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. हिंसाचाराची पार्श्वभूमी आणि कोरोनाची साथ यामुळे अत्यंत कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत बायडेन आणि हॅरीस शपथ घेणार आहेत.


नवनिर्वाचित जो बिडेन बुधवारी अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतील. बायडेन एकतेचा संदेश घेऊन वॉशिंग्टन डीसी येथे पोहोचले. बायडेन यांना अध्यक्ष म्हणून अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. कोरोना संकटामुळे या वेळी शपथविधी कार्यक्रमात कोणतीही गर्दी होणार नाही याची काळजी घेतली गेली आहे.


अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बिडेन यांनी शपथविधी सोहळ्यापूर्वी सांगितले की, हा अमेरिकेसाठी नवीन दिवस आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथविधी होण्यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून शेवटच्या दिवशी व्हाईट हाऊस सोडले.