नवी दिल्ली : एका अदृश्य व्हायरसनं अख्ख्या जगाला वेठीला धरलं आहे. इटलीमध्ये एका दिवसात ३६८ जणांचा मृत्यू झाला, यावरुन या कोरोनाला किती गांभीर्यानं घ्यायला हवं, याचा अंदाज येईल. हे असंच सुरू राहिलं तर दुसऱ्या महायुद्धापेक्षाही जास्त विनाश या कोरोनामुळे होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या महायुद्धात एका दिवशी २०७ जणांचा मृत्यू झाला होता. पण कोरोनामुळे एका दिवसात ३६८ मृत्यू झाला. कोरोनानं इटलीला अत्यंत वाईट पद्धतीनं विळखा घातला आहे. रविवारी एका दिवसात इटलीमध्ये तब्बल ३६८ जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण जगाला याचा धक्का बसला. हा आकडा नक्कीच घाबरवणारा आहे. जगभरातल्या आतापर्यंतच्या कोरोना बळींचा हा दिवसभरातला सगळ्यात मोठा आकडा आहे. याआधी इटलीमध्येच एका दिवसात अडीचशे जणांचा बळी गेला होता.


चीननंतर कोरोनाचा सर्वाधिक धोका युरोपातल्या देशांना आहे. इटलीमध्ये आतापर्यंत १८०० जणांचा बळी गेला आहे. तर २५ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.


कोरोनामुळे इटलीत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. फक्त हॉस्पिटल्स आणि मेडिकल दुकानं सुरू आहेत. रस्त्यावर कुणीही विनाकारण फिरताना दिसलं तर त्याच्याकडून जवळपास दीड हजारांचा दंड वसूल केला जातो आहे. यंदा व्हॅटिकन सिटीमध्ये ईस्टर हा सण साजरा केला जाणार नाही. पोप लोकांना संबोधितही करणार नाही. त्याऐवजी फक्त वेबसाईटमार्फत पोपचा संदेश प्रसारित केला जाणार आहे.


कोरोनाला जागतिक आरोग्य संघटनेनं महामारी घोषित केलंय. सगळ्याच देशांनी कठोर उपाय करणं, ही या क्षणाची गरज आहे. नाहीतर ही महामारी भयानक रुप घेईल, याची भीती आहे.