मुंबई : गेल्या काही वर्षांपासून भारतीयांचा कल पर्यटनाकडे वाढत आहे. याच गोष्टीचा अंदाज घेत थेट केंद्र सरकारकडूनही काही महत्त्वाची पावलं उचलण्यात येत आहेत. साचेबद्ध वेळांमध्ये ऑफिसच्या वाटांवर जाणारी तरुणाई आणि बॅकपॅकिंग सहलींकडे त्यांचा वाढता कल यांमुळे अनेकांची पुरती जीवनशैलीच बदलली आहे. सतत बहुविध ठिकाणांना भेट देणाऱ्या या फिरस्त्यांसाठी काही ठिकाणं म्हणजे त्यांच्या बकेट लिस्टचा भाग. याच यादीतील एक नाव म्हणजे भूतान. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Land Of Happiness म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देशाच भटकंतीसाठी जाणाऱ्या भारतीयांची संख्या मागील तीन वर्षांमध्ये बऱ्याच अंशी वाढली आहे. पण, येत्या काळात मात्र भूतानला जाणं खिशाला चांगलंच शेकणार आहे, असं चित्र दिसत आहे. 


भूतानच्या संसदेत मांडण्यात आलेल्या एका प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यामुळे आता भारत, बांगलादेश आणि मालदीव येथून जाणाऱ्या पर्यटकांकडून भूतानमध्ये प्रवास करण्यासाठी आणि वास्तव्यासाठी दर दिवशी "sustainable development" अर्थात शाश्वत प्रगतीच्या कारणास्तव १२०० रुपये द्यावे लागणार आहेत. जुलै २०२० पासून हा नवा नियम लागू होणार आहे. 


सोमवारी या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी देण्यात आली. भारतीय पर्यटकांचा भूतानच्या दिशेने वाढता ओघ पाहता हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या घडीला परदेशी पर्यटकांकडून भूतानमध्ये जवळपास $250 म्हणजेच जवळपास १८ हजार रुपये प्रत्येक व्यक्तीला भरावे लागतात. ज्यामध्ये $65 इतकी किंमत Sustainable Development fee आणि $40 व्हिसा मूल्याचाही समावेश आहे. पण, यामध्ये भारत, बांगलादेश आणि मालदीव येथील पर्यटकांकडून मात्र कोणत्याच प्रकारचं मूल्य आकारण्यात येत नाही. पण, यापुढे मात्र त्यांनाही भूतानमध्ये पर्यटनासाठीचे निर्धारित दर भरावे लागणार आहेत. 


विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ



दरम्यान भारतीय पर्यटकांना या वृत्ताने धक्का दिला आहे. काहींनी यासंदर्भात नाराजीही व्यक्त केली आहे. भारतातील पर्यटकांना भूतानला जाण्याचं प्रमाण पाहता येत्या काळात सरकारकडून लावण्यात आलेले Sustainable Developmentच्या नावे आकाराल्या जाणाऱ्या दरांमुळे पर्यटकांच्या संख्येत घट होण्याची भीतीही काही टूरिस्ट कंपन्यांनी वर्तवली आहे.