LPG ची किंमत दुप्पट! येथे एक सिलिंडर 2657 रुपयांना, दुधाचा भाव 1195 रुपये
LPG Price Hike : महागाईचा परिणाम केवळ भारतातच नाही, तर इतर देशांमध्येही तो दिसून येत आहे. भारतात एलपीजी सिलिंडरची किंमत सातत्याने वाढत आहे.
कोलंबो : LPG Price Hike : महागाईचा परिणाम केवळ भारतातच नाही, तर इतर देशांमध्येही तो दिसून येत आहे. भारतात एलपीजी सिलिंडरची किंमत सातत्याने वाढत आहे. परंतु केवळ भारतातच नव्हे तर शेजारील देशांमध्येही एलपीजीच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. श्रीलंकेत एलपीजीची किंमत दुप्पट झाली आहे. (LPG price doubled! One cylinder is getting Rs 2657 in Sri Lanka)
येथील सरकारने अलीकडेच जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीची मर्यादा संपुष्टात आणण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर एलपीजीच्या किरकोळ किमतीत सुमारे 90 टक्के वाढ झाली आहे. दरम्यान, 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडर अजूनही भारतात 1000 रुपयांपेक्षा कमी आहे.
2,657 रुपये किमतीचे सिलिंडर
श्रीलंकेत गेल्या शुक्रवारी मानक घरगुती एलपीजी सिलिंडरची (12.5 किलो) किंमत 1,400 रुपये होती. पण, आता त्यात 1,257 रुपयांनी वाढून तो 2,657 रुपये झाला आहे. याशिवाय एक किलो दूध आता 250 ते 1,195 रुपयांनी महाग झाले आहे. त्याचप्रमाणे गव्हाचे पीठ, साखर आणि सिमेंट यासारख्या आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
लोकांनी व्यक्त केली नाराजी
एलपीजीच्या किमतीत विक्रमी वाढ झाल्याने येथील लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या वाढलेल्या किमती मागे घेण्याच्या मागणीसह लोकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या प्रवक्त्याने सांगितले, 'मंत्रिमंडळाने दूध पावडर, गव्हाचे पीठ, साखर आणि द्रवरूप पेट्रोलियम गॅसवरील किंमती नियंत्रण काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामागील कारण असे होते की यामुळे पुरवठा वाढेल. किंमती 37 टक्क्यांनी वाढू शकतात, परंतु आम्ही डीलर्सना अनावश्यक नफा कमवू नये अशी अपेक्षा करतो, असे म्हटले आहे.
राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर गुरुवारी रात्री श्रीलंका सरकारने दूध पावडर, गॅस, गव्हाचे पीठ आणि सिमेंटची किंमत मर्यादा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे.