नवी दिल्ली : मानवाधिकारासाठी ओळखली जाणारी मूळ पाकिस्तानी वंशाची नोबल शांति पुरस्कर विजेती मलाला युसूफजई हिने काश्मीर मुद्दावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. 'गेल्या सात दशकांपासून सुरू असलेली हिंसा संपुष्टात यायला हवी' असं म्हणत मलालानं आपलं मत मांडलंय. काश्मीरच्या मुद्यावर बोलताना मलालानं ना भारताचा उल्लेख केलाय ना पाकिस्तानचा... तसंच तिनं जम्मू-काश्मीर संबंधित अनुच्छेद ३७० चा उल्लेखही टाळलाय. सोशल मीडियाद्वारे मलालानं आपला हे मत मांडलंय. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'भारत - पाकिस्तानचा हा काश्मीरची समस्या हा फार जुना मुद्दा आहे. जेव्हा माझे आई - वडील लहान होते आणि माझे आजोबा - आजी तरुण होते तेव्हापासून काश्मीरमध्ये ही समस्या अस्तित्वात आहे. गेल्या सात दशकांपासून काश्मीरमधली मुलं हिंसेच्या वातावरणात वाढत आहेत' असं म्हणत मलालानं आपली चिंताही व्यक्त केलीय.  


'दक्षिणी आशिया हे आपलं घर आहे, त्यामुळे आपल्याला तिथली काळजी असल्याचंही मलालानं म्हटलंय. दक्षिणी आशिया १.८ अब्ज लोकसंख्या आहे आणि त्यामध्ये कश्मीरचादेखील समावेश होतो' असं म्हणत या मुद्याशी आपणदेखील जोडले गेलो आहोत हेच मलालानं दर्शवलंय.


'आपण वेगवेगळ्या संस्कृती, धर्म, भाषा, खाद्यपदार्थ आणि वेशभूषा बाळगतो... आणि मला खात्री आहे की आपण शांततेत नांदू शकतो' असं म्हणत असतानाच या दीर्घकालीन समस्येवर नक्कीच तोडगा निघू शकेल अशी आशाही मलालानं व्यक्त केलीय.


मुलींच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या मलालावर पाकिस्तानातील कट्टरतावाद्यांकडून जीवघेणा हल्ला झाला होता. सध्या मलाला लंडनमध्ये राहून शिक्षण घेत आहे.