वेगानं फिरतोय `मंगळ`; या लालबुंद ग्रहाचा वेग अचानक का वाढलाय?
Mars Space Facts : सध्या जागतिक अंतराळ वर्तुळात एकाच गोष्टीची चर्चा सुरु आहे, ती म्हणजे भारताच्या `चांद्रयान 3` मोहिमेची. पण, विस्तीर्ण आणि तितक्याच महाकाय अशा अवकाशात इतरही बऱ्याच घडामोडी घडत आहेत.
Mars Space Facts : हे जग जितकं मोठं आहे त्याहूनही कैक पटींनी, आपण कल्पनाही करू शकत नाही इतकी मोठी आकाशगंगा आहेत. या आकाशगंगेतील प्रत्येक लहानमोठ्या घटकाचा अभ्यास जागतिक अवकाश संशोधन संस्थानकडून केला जात आहे. भारतही या शर्यतीत मागे नाही. सध्या भारताचं सर्व लक्ष चांद्रयान 3 मोहिमेवर लागलेलं असतानाच दुसरीकडे अवकाशातील एका घटनेनं शास्त्रज्ञांच्या नजरा वळवल्या आहेत.
सूर्यमालेत नेमकं काय सुरुये?
शालेय अभ्यासक्रमात आपण सर्वांनीच परिभ्रमण, परिक्रमण या संज्ञा शिकल्या. जिथं लक्षात आलं की सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याभोवती स्वत:च्या निर्धारित कक्षेतून परिक्रमण करतात. ज्यामुळं दिवस आणि रात्रीचं गणित मांडता येतं. पृथ्वीसाठीही हाच नियम लागू. पृथ्वीचा शेजारी ग्रह असणाऱ्या मंगळावर मात्र परिस्थिती काहीशी वेगळी आहे. कारण इथं एका दिवसात 24 तास 34 मिनिटं असतात. याचा अभ्यास केला असता मंगळावर दिवस लहान होत असल्याची बाब लक्षात आली. वैज्ञानिकांच्या माहितीनुसार मंगळाचं हे फिरणं 4 मिलीएआरसीसेकेंड (milliarcseconds) नं वाढत आहे.
वाढलेल्या वेगाचा मंगळावर काय परिणाम?
अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्था NASA च्या इनसाईट मार्स लँडर मोहिमेतून समोर आलेल्या माहितीनुसार ते मंहगळाचा अचूक वेग टीपण्यात यशस्वी झाले आहेत. मंगळाची वाढलेली गती एका मंगळ वर्षामध्ये एक मिलीसेकंद अंशाच्या बरोबरीची आहे.
हेसुद्धा वाचा : ताटातून भात गायब होणार? तांदळाच्या दरात विक्रमी वाढ; 15 वर्षात पहिल्यांदाच 'इतका' महाग
नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीनुसार ही आकडेवारी इनसाईट मार्स लँडरवर लावण्यात आलेल्या रेडियो ट्रांसपाँडर आणि अँटीनामुळं मिळू शकली आहे. वैज्ञानिक भाषेला या कृतीला रोटेशन अँड इंटीरियर स्ट्रक्चर एक्सपेरिमेंट (RISE) असंही म्हटलं जातं. अद्यापही मंगळाचा वेग नेमका का वाढला आहे ही बाब मात्र लक्षात येऊ शकलेली नाही. पण, इथून पुढं या घटनेवर लक्ष ठेवण्यात येणार असून, येत्या काळात त्यामागची कारणं लगेचच लक्षात येतील असं संशोधकांचं मत आहे.
पृथ्वीचा वेगही वाढला...
फक्त मंगळच नव्हे, तर पृथ्वीच्या फिरण्याचा वेगही वाढल्याची माहिती संशोधकांनी दिली होती. उपलब्ध आकडेवारीनुसार मागील वर्षी 29 जुलै रोजी पृथ्वीनं स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तासांहून कमी वेळ घेतला होता.