Dream Job! पगार आठवड्याला 3.6 लाख, 4 Days Week काम अन्...; UNO ची भन्नाट ऑफर
Chief UNO Player Post Job Salary Details: आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींच्या माध्यमातून पैसा कमवण्यासारखं समाधान नाही. तुम्हालाही उनो खेळायला आवडत असेल तर तुमच्यासाठी एका कंपनीने एक भन्नाट ऑफर दिली असून ही ऑफर पाहून तुम्ही थक्क व्हाल.
Chief UNO Player Post Job Salary Details: असं म्हणतात की, पैसे कमवण्याचा सर्वात समाधानी मार्ग म्हणजे असं काम करा ज्यामधून तुम्हाला आनंद मिळतो. पण सर्वांनाच हे शक्य होतं असं नाही. मात्र तुम्हाला उनो खेळायला आवडत असेल तर तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. 'मॅटल' ही प्रसिद्ध खेळण्यांच्या कंपनीने, 'चीफ उनो प्लेअर' नावाने भरतीसंदर्भातील माहिती जारी केली आहे. म्हणजेच उनो खेळता येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला या जॉबसाठी अर्ज करता येईल. विशेष म्हणजे या जॉबसाठी महिन्या अथवा वर्षाला नाही तर आठवड्याला लाखो रुपयांचं पॅकेज दिलं जाणार आहे.
4 दिवसच काम करायचं
उनो खेळ शिकण्याची इच्छा असलेल्यांना हा खेळ शिकवण्याची मुख्य जबाबदारी या चीफ उनो प्लेअरवर असेल. या कामासाठी किती पगार मिळणार असा प्रश्न पडला असेल तर एका आठवड्यासाठी चीफ उनो प्लेअरला तब्बल 3 लाख 60 हजार रुपये म्हणजेच महिन्याचे 15 लाखांहून अधिक रुपये दिले जाणार आहेत. 'मॅटल' सध्या 'चीफ उनो प्लेअर'च्या शोधात आहे. 'उनो क्वाट्रो' कार्ड गेम शिकवण्यासाठी ही भरती केली जाणार आहे. कंपनीने ही जबाबदारी पार पाडणाऱ्याला आठवड्याला 4 हजार 444 डॉलर्स वेतन देण्याची तयारी दर्शवली आहे. 'चीफ उनो प्लेअर'ने आठवड्यातून केवळ 4 दिवसच काम करणे अपेक्षित आहे. त्यामुळे कार्ड गेम्सची आवड असणाऱ्यांना त्यांच्या आवडीमधून चांगली घसघशीत कमाई करण्याची संधी या कंपनीने दिली आहे.
काय काम करायचं?
'मॅटल'ने जारी केलेल्या पत्राकामध्ये, 'चीफ उनो प्लेअर'ने दिवसाला किमान 4 तास 'उनो क्वाट्रो' खेळावा लागणार आहे असं स्पष्ट केलं आहे. तसेच अनोळखी व्यक्तींनीही हा गेम खेळावा यासाठी प्रयत्नही या 'चीफ उनो प्लेअर'ला करावा लागणार आहे. हा गेम कसा खेळायचा, त्याचे नियम काय आहेत, काय करावं, काय करु नये हे सारं या 'चीफ उनो प्लेअर'ने समजावून सांगणं अपेक्षित आहे. 'मॅटल'चे उपाध्यक्ष आणि जागतिक स्तरावरील गेम्स क्षेत्रातील कंपनीचे प्रमुख असलेल्या रे अॅडलर यांनी, "सायंकाळी उनो खेळायला कोणाला आवडत नाही? विशेष म्हणजे हे करण्यासाठी पैसेही मिळणार आहेत," अशी प्रतिक्रिया या ऑफरबद्दल बोलताना नोंदवली.
चाहत्यांना घेता येणार आनंद
"चाहत्यांनी नवीन नवीन पद्धतीने उनो खेळावं यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. 'चीफ उनो प्लेअर'च्या माध्यमातून आम्ही चाहत्यांना मदत करु इच्छिणारी एक यंत्रणा उभारत आहोत. या माध्यमातून अधिक प्रभावीपणे आणि उत्साहाने चाहत्यांना उनोचा आनंद घेता येणार आहे. जगभरामध्ये आमचा नवा 'उनो क्वाट्रो' गेम लोकप्रिय करणाऱ्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना नोकरी देण्यासाठी आम्ही अर्ज मागवत आहोत," असं कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय.