कोरोना बळींची संख्या आता एक लाखाच्या घरात
गेल्या ९ दिवसांत ५० हजारावर बळी
ब्युरो रिपोर्ट : जगभरातल्या कोरोना बळींचा आकडा आणखी काही तासात एक लाखांच्या वर जाण्याची शक्यता आहे. युरोप आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांत सुरु असलेला कोरोनाचा कहर इतका होता की एप्रिल महिन्याच्या सुरुवातीच्या ९ दिवसांतच ५३ हजारांवर बळी गेले आहेत. या आकडेवारीनुसार रोज सरासरी ६ हजारांच्या जवळपास कोरोनाचे रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत.
इटली, अमेरिका, स्पेन, फ्रान्स, ब्रिटन या देशांत सध्या कोरोनाचं संकट तीव्र असून रोजच्या रोज या देशांत शेकडो बळी जात आहेत. जगभरात १६ लाखांवर लोकांना कोरोनाची लागण झाली असून दररोज त्यात झपाट्यानं वाढ होत आहे.
तीन दिवस अमेरिकेत कहर
अमेरिकेत गेले तीन दिवस दररोज १९०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील कोरोना बळींची संख्या आता १७ हजारांच्या जवळपास पोहचली आहे. इटलीमध्ये सर्वाधिक म्हणजे १८ हजारांवर बळी गेले आहेत. त्यानंतर स्पेनमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १६ हजाराच्या जवळपास पोहचली आहे. स्पेनमध्ये गेल्या १७ दिवसांत गुरुवारी मृतांची संख्या थोडी घटली. तरीही स्पेनमध्ये गुरुवारी ६०५ बळी गेले.
फ्रान्समध्येही कोरोनामुळे १२ हजारांवर बळी गेले आहेत. त्यानंतर ब्रिटनमध्ये कोरोना मृतांची संख्या ८ हजाराच्या जवळ पोहचली आहे. त्यानंतर इराणमध्ये ४ हजार २३२, चीनमध्ये ३ हजार ३३६ बळी गेले आहेत.
बेल्जियमनेही कोरोनाचा कहर जोरात असून बळींचा आकडा ३ हजारावर गेला आहे. त्यानंतर जर्मनीत २ हजार ६०० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले, तर नेदरलँडमध्ये अडीच हजारावर लोकांचा बळी गेला आहे.
दर १५ सेकंदाला एक बळी
गेल्या नऊ दिवसांतील कोरोना बळींची आकडेवारी पाहिली तर जगभरात दर १५ सेकंदाला एक बळी गेला आहे. अमेरिकेत गेल्या चार दिवसांतील आकडेवारी पाहिली तर दर मिनिटाला एक बळी गेला आहे. यावरून जगभरात कोरोनाचा कहर किती तीव्र आहे याचा अंदाज येऊ शकतो.