इथं मिळतोय सोन्याचा वडापाव; हा खायचा की तिजोरीत ठेवायचा?
मुंबई वडापाव हा सर्वत्र प्रसिद्ध आहे. केवळ मुंबईतच नाही, तर देशाबाहेरील लोकं देखील आवडीने वडापाव खातात.
मुंबई : मुंबई वडापाव हा सर्वत्र प्रसिद्ध आहे. केवळ मुंबईतच नाही, तर देशाबाहेरील लोकं देखील आवडीने वडापाव खातात. अलीकडेच वडापावाबद्दल एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. जी ऐकून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. आपण मुंबईत 10 ते 20 रुपयात वडा-पाव खातो. त्यात जर तुम्ही चांगल्या दुकानात गेलात आणि वडापाव मागवलात किंवा फ्यूजन वडापाव घेतलात, तर त्याची किंमत 100 रुपयांच्या आत असेल, पण तुम्हाला सांगितलं की, 2 हजार रुपयांचा वडापाव देखील आहे तर? तुम्हाला नक्कीच याचे आश्चर्य वाटेल. तुम्ही म्हणाल की, एवढं काय टाकलं असेल त्यात?
हा वडापाव दुबईत विकला जात आहे, ज्याची किंमत तेथे सुमारे 100 युएई दिरहम, म्हणजेच सुमारे 2 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. आता लोकांना उत्सुकता लागली आहे की, एवढ्या महागड्या किंमतीत विकल्या जाणाऱ्या वडापावामध्ये काय खास आहे. त्याची किंमत इतकी का ठेवली गेली आहे? तर हा वडापाव सोन्याचा बनलेला आहे.
जगातील पहिला 22 कॅरेट सोन्याचा मुलामा असलेला वडापाव
मुंबईकरांचा आवडता नाश्ता किंवा जेवण असलेला 'वडापाव' हा जगात पहिल्यांदा 22 कॅरेट सोन्याचा मुलामा चढवून विकला जात आहे. या वडापावला ट्रफल बटर आणि चीज सह बनवले गेले आहे. एवढेच नाही तर तोंडात पाणी आणणारा हा वडापावाला 22K सोन्याच्या वर्कने झाकलेला आहे. यामुळेच या वडापावाची किंमत इतकी जास्त आहे.
Masarat Daud नावाच्या ट्विटर अकाउंटवरुन व्हिडीओ शेअर केला आहे, जो 13 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. हा सोन्याचा वडापाव सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. तर काही लोकांनी हा वडापाव खाण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे.