पार्कर सोलार प्रोब सूर्यावर धडकणार
सूर्याचा जवळून अभ्यास करणं शक्य होणार
मुंबई : पृथ्वीला ऊर्जा देणारा आपला तारा म्हणजे सूर्य. सूर्यावर घडणाऱ्या लहानमोठ्या घटनांचा आपल्यावर थेट परिणाम होतो. म्हणूनच आपल्या ताऱ्याचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. त्यामुळेच अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेची पुढली मोहीम महत्त्वाची ठरते.
सूर्योदयी हा वीर जन्मला...
त्रिशत योजने नभी उडाला...
समजुनिया फळ रविबिंबाला...
धरू गेला भास्वान...
सूर्याकडे झेपावलेल्या हनुमंताचं हे गीतरामायणातलं वर्णन... मात्र ज्ञात इतिहासात असं खरोखर घडलेलं नाही... आता ते घडणार आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था, अर्थात नासानं तयार केलेला पार्कर सोलार प्रोब सूर्यावर धडकणार आहे. तो केवळ सूर्याचा अभ्यासच करणार नाहीये, तर त्यावर धडकही देणार आहे. यामुळे आपल्या ताऱ्याचा अतिशय जवळून अभ्यास करणं शक्य होणार आहे. पार्कर सोलार प्रोब ही मोहीम ७ वर्षांची असणार आहे, तो सूर्याच्या वातावरणातून २४ वेळा परिक्रमा करेल. आतापर्यंत झालेल्या सगळ्या मोहिमांमध्ये पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या सर्वाधिक जवळ जाईल. ३१ जुलै रोजी हा प्रोब सूर्याच्या दिशेने झेप घेणार आहे.
१९५८ साली सोलार विंड म्हणजे सौरवाऱ्यांचा शोध लावणारे संशोधक युगेन पार्कर यांचं नाव या मोहिमेला देण्यात आलंय. पार्कर शिकागो विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहेत. विशेष म्हणजे पार्कर यांचं छायाचित्र आणि त्यांचा सौरवाऱ्यांबाबतच्या शोधनिबंधाची प्रतही या प्रोबसोबत सूर्यावर धाडण्यात येणार आहे. याखेरीज ११ लाख ३७ हजार २०२ माणसांची नावंही सूर्याकडे धाडण्यात येणार आहेत. या मोहिमेची आखणी सुरू असताना सर्वसामान्यांकडून ही नावं मागवण्यात आली होती... ज्यांना आपलं नाव सूर्यावर पाठवायची इच्छा आहे, त्यांना नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. ही सगळी माहिती एका मायक्रोचिपमध्ये भरण्यात आली आहे. ही मायक्रोचिप नुकतीच यानावर बसवण्यात आली.
नासाच्या मोहिमेमध्ये अशा पद्धतीनं नावं अंतराळात धाडण्याची ही पहिलीच वेळ आहे... अर्थात, या मोहिमेचं महत्त्व या नावांपेक्षा कितीतरी अधिक आहे. सूर्य पृथ्वीवरच्या सर्व चल-अचल जीवसृष्टीचा ऊर्जादाता असला तरी त्याची म्हणावी तितकी माहिती अद्याप आपल्या हाती आलेली नाही... सूर्याच्या वातावरणाचा आणि त्यावर होणाऱ्या घटनांचा पृथ्वीवर होणारा थेट परिणाम गृहित धरून या ताऱ्याचा अधिक अभ्यास होणं गरजेचं आहे... नासाची पार्कर सोलार प्रोब ही मोहीम या अभ्यासासाठी अतिशय महत्त्वाची आहे.