अमेरिकेत एका कैद्याला नायट्रोजन गॅसच्या आधारे मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कैद्याला अशा प्रकारची शिक्षा दिली जाणार आहे. ज्या कैद्याला नायट्रोजन गॅसच्या आधारे मृत्यूची शिक्षा दिली जाणार आहे त्याचं नाव केनेथ युगिन स्मिथ असं आहे. 1996 मध्ये त्यााल मृत्यूदंड ठोठावण्यात आला होता. 2022 मध्ये त्याला विषारी इंजेक्शन देण्यात आलं होतं. पण तो त्यातून वाचला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

25 जानेवारीला स्मिथच्या शिक्षेची अंमलबजावणी होणार आहे. त्याच्या वकिलांनी याविरोधात कोर्टात धाव घेतली असून, हा भयानक अत्याचार असल्याचं म्हटलं आहे. स्मिथवर प्रयोग केला जात असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे. यात फक्त जोखीमच नाही तर संविधानाचं उल्लंघनही होत असल्याचं ते म्हणाले आहेत. संयुक्त राष्ट्रानेही यावर आक्षेप नोंदवला आहे. संयुक्त राष्ट्राने हे अमानवीय आणि क्रूर असल्याचं सांगत शिक्षेवर स्थगिती आणण्याची मागणी केली आहे. 


अशा प्रकारे दिली जाणार शिक्षा - 


न्यूज एनज्सीनुसार, सर्वात आधी स्मिथला स्ट्रेचरवर झोपवण्यात येईल. यानंतर त्याच्या चेहऱ्यावर एक मास्क लावला जाईल. हे मास्क तसंच असेल ते कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचं काम करतं. यानंतर त्याला त्याची शेवटची इच्छा विचारण्यात येईल.


सर्वात आधी नायट्रोजन गॅस सोडला जाईल. मास्कच्या आधारे नायट्रोजन थेट त्याच्या शरिरात जाईल. मास्क असल्याने त्याला ऑक्सिजन मिळणार नाही आणि मृत्यू होईल. 


मास्कच्या आधारे त्याला जवळपास 15 मिनिटं नायट्रोजन गॅस दिला जाईल. सरकारी वकिलांना कोर्टात सांगितलं आहे की, नायट्रोजन गॅसमुळे काही सेकंदात तो बेशुद्ध होईल आणि काही मिनिटात त्याचा मृत्यू होईल. 


नायट्रोजन गॅसचा ना कोणता रंग असतो, ना कोणता वास असतो. आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा त्यात 78 टक्के नायट्रोजन गॅस असतो. पण आपण सोबत ऑक्सिजनही घेत असल्याने तो धोकादायक ठरत नाही. पण जेव्हा त्याच्यासह ऑक्सिजन मिळत नाही तेव्हा धोका निर्माण होतो. जर हवेत 100 टक्के नायट्रोजन असेल तर कोणाचाही मृत्यू होईल. स्मिथचा मृत्यू असाच होणार आहे. त्याला अजिबात ऑक्सिजन मिळणार नाही. 


अमेरिकेत आतापर्यंत विषारी इंजेक्शन देऊन मृत्यूदंड दिला जात होता. पण आता ते नवे मार्ग शोधत आहेत. नोव्हेंबर 2022 मध्ये स्मिथला विषारी इंजेक्शन देण्याचा प्रयत्न झाला होता. पण डॉक्टरांना नस मिळत नसल्याने टाळलं होतं.