उत्तर कोरियानं पुन्हा एकदा केली अणुचाचणी
अमेरिकेनं दिलेल्या धमक्या धुडकावून लावत उत्तर कोरियानं शुक्रवारी पुन्हा एकदा अणु चाचणी केलीय.
नवी दिल्ली : अमेरिकेनं दिलेल्या धमक्या धुडकावून लावत उत्तर कोरियानं शुक्रवारी पुन्हा एकदा अणु चाचणी केलीय.
या अणु चाचणीमुळे परिसरात २.७ तीव्रतेचा भूकंपाचा झटका बसला. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, भूकंपाच्या या ताज्या झटक्यामुळे, ३ सप्टेंबर रोजी उत्तर कोरियानं केलेल्या अणु चाचणीमुळे भूगर्भीय स्थितीला मोठं नुकसान झाल्याचं स्पष्ट होतंय. या चाचणीमुळे ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा झटका बसला होता.
त्यावेळी उत्तर कोरियाच्या दाव्यानुसार त्यांनी हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली होती. हा बॉम्ब अणुबॉम्बपेक्षा १०० टक्के अधिक शक्तिशाली असतो. उत्तर कोरियानं बनवलेला हा बॉम्ब ६० किलोटनच्या क्षमतेचा मानला जात होता... जो जपानवर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बपेक्षा २० टक्के जास्त शक्तिशाली होता.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, उत्तर कोरियानं केलेला हा स्फोट जगातील आत्तापर्यंतचा सर्वात शक्तिशाली कृत्रिम स्फोट होता. यामुळे उत्तर कोरियाच्या पुंगे-री या परिक्षण स्थळाला मोठं नुकसान झालंय. ही जमीन आता पुन्हा एका नव्या अणु चाचणीसाठी योग्य राहिलेली नाही.