Omicron ने चिंता वाढवली, नव्या रिपोर्टमध्ये आली महत्त्वाची माहिती समोर
ओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत काही नविन गोष्टी जगासमोर आल्या आहेत
Omicron Variant : कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन (Omicron) या नवीन व्हेरिएंटने संपूर्ण जगात दहशतीचं वातावरण आहे. Omicron हा आतापर्यंत 38 देशांमध्ये पसरला आहे. ओमायक्रॉनची रोज नवीन प्रकरणं समोर येत आहेत. ओमायक्रॉन डेल्टापेक्षा अधिक धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे. ओमिक्रॉनबाबत सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने ओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत काही नविन गोष्टी जगासमोर आणल्या आहेत.
ओमायक्रॉनचा धोका कुणाला?
सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने केलेल्या प्राथमिक अभ्यासानुसार ओमायक्रॉन डेल्टा आणि बीटापेक्षा अधिक संसर्गजन्य आहे. या रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की जे लोक COVID-19 मधून बरे झाले आहेत त्यांना पुन्हा ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. लसीच्या परिणामकारकतेबाबतही शंका उपस्थित केल्या जात आहेत. कारण सिंगापूरमध्ये लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या 37 वर्षीय पुरुषाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचं आढळून आलं आहे.
ओमायक्रॉन व्हेरिएंटवर कोरोना लस किती प्रभावी आहे, यासंदर्भात अभ्यास केला जात आहे. पण सध्याची लस या व्हेरिएंटवर प्रभावी ठरेल, लोकांनी लवकरात लवकर लसीचे दोन्ही डोस घ्यायला हवेत असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
ओमायक्रॉनची लक्षणं
सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ओमायक्रॉन झालेल्या रुग्णामध्ये सौम्य लक्षण आढळून आलं आहे. तसंच या व्हेरिएंटमुळे अजून मृत्यू झाल्याचं एकही प्रकरण समोर आलेलं नाही.
सिंगापूरमध्ये कोरोनाची परिस्थिती
सिंगापूरमध्ये गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे 552 नवीन रुग्ण आढळले आहेत. देशातील कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 269,211 वर पोहोचली आहे. सध्या रुग्णालयांमध्ये कोरोनाचे एकूण 863 रुग्ण आहेत, त्यापैकी 155 बाधितांना ऑक्सिजनची गरज आहे, तर 6 रुग्ण गंभीर आहेत आणि ते डॉक्टरच्या निरीक्षणाखाली आहेत. तसंच 52 रुग्ण आयसीयूमध्ये आहेत.