स्वित्झर्लंड : बलात्कारातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा केली जावी अशी मागणी केली जाते. पण स्वित्झर्लंडमध्ये (Switzerland) बलात्कार प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या एका आश्चर्यकारक निर्णयाने देशभर संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे एका महिला न्यायाधिशाने हा निर्णय दिला असून या निर्णयाविरोधात मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकी घटना काय आहे?


ही घटना फेब्रुवारी 2020 मधली आहे. बेसल शहरात राहणाऱ्या 33 वर्षीय महिलेने आरोप केला की तिच्या घराबाहेर दोन व्यक्तींनी तिच्यावर हल्ला केला आणि तिला बंदी बनवलं. यानंतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. यापैकी एका आरोपीचं वय 17 वर्ष होतं, तर दुसऱ्या आरोपीचं वय 32 वर्ष होतं. 


या दोनही आरोपींना अटक करण्यात आलं. यापैकी अल्पवयीन मुलाला कोणतीही शिक्षा सुनावण्यात आली नाही. तर दुसऱ्या आरोपीला 51 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. आरोपींनी शिक्षेविरोधात याचिका दाखल केली. यानंतर स्थानिक न्यायालयात सुनावणी सुरु असताना आरोपीची शिक्षा 51 महिन्यावरुन 36 महिन्यांपर्यंत कमी करण्यात आली.


इतकंच नाही तर 'पीडित महिलेनंच काही विशिष्ट संकेत दिले असतील, म्हणून हा प्रसंग ओढवला', अशी टिप्पणी निकाल सुनावणाऱ्या महिला न्यायाधिशांनी केली. तसंच 'पीडित महिलेवर फक्त 11 मिनिटं बलात्कार झाला' असं सांगत आरोपीची शिक्षा कमी करत असल्याचं या महिला न्यायाधिशांनी म्हटलं. 


न्यायालयाच्या या निर्णयावर पीडित महिलेच्या वकिलांनी निराशा व्यक्त करत पीडितेला मोठ् धक्का बसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. देशभरातही या निर्णयाविरोधात संतप्त भावना व्यक्त होत असून मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर आंदोलन करत आहेत. 'बलात्कार हा बलात्कारच असतो', अशा घोषणा आंदोलकांकडून दिल्या जात आहेत.