45 Killed In Bus Accident: दक्षिण आफ्रिकेमध्ये एक मोठा आणि भीषण अपघात झाला आहे. येथे एक प्रवासी बस 165 फूट खोल दरीमध्ये पडली. या बसमधून प्रवास करणाऱ्या 45 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये केवळ एक 8 वर्षांची मुलगी चमत्कारिकरित्या बचावली आहे. बीसीसीने दिलेल्या वृत्तानुसार, वाचलेल्या या मुलीला गंभीर जखमा झाल्या असून तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.


नक्की घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही प्रवासी बस एका बॅरिकेटला धडकली. बस दरीमध्ये पडतानाच तिच्यात एक स्फोट झाला आणि बसला आग लागली. ही बस बोत्सवाना देशातून दक्षिण आफ्रिकेच्या ईशान्येकडील लिम्पोपो प्रांतातील मोरिया शहराकडे जात होती. बसमध्ये ईस्टरनिमित्त दक्षिण आफ्रिकेत जाणारे प्रवासी भक्त प्रवास करत होते. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण आफ्रिकेतील सरकारी ब्रॉडकास्टर असलेल्या एसएबीसीच्या माहितीप्रमाणे या बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. हा अपघात जोहान्सबर्ग शहरापासून 300 किलोमीटर दूर उत्तरेला अशलेल्या मोकोपेन आणि मार्केनदरम्यान असलेल्या मम्मटलाकला पर्वत रांगेत झाला. एका पुलावरुन ही बस दरीत पडली. गुरुवारी रात्री सायंकाळपर्यंत मदतकार्य सुरु होतं. हा अपघात एवढा भीषण होता की गाडीच्या मलब्याखाली अडकून मारण पावलेल्या काही प्रवाशांच्या मृतदेहाची ओळखही पटवणं कठीण झालं आहे. काही मृतदेह वरुन दिसत होते तरी तिथपर्यंत पोहचणं रात्री उशीरापर्यंत शक्य झालं नव्हतं.


दुर्घटनेची कारणं शोधणार


सदर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर परिवहन मंत्री सिंदिसिवे चिकुंगा यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. सर्व मृतदेह बोत्सवानाला पाठवण्यासाठी सरकार सर्व ती मदत करेल असं चिकुंगा यांनी जाहीर केलं आहे. 'या दुखद दुर्घटनेमुळे परिणाम झालेल्या कुटुंबाप्रती आम्ही सहवेदना व्यक्त करतो. दक्षिण आफ्रिकेचं सरकार सर्व मृतदेह परत पाठवण्यासाठी शक्यत ती सर्व मदत करणार आहे. झालेल्या दुर्घटनेच्या कारणांचा पूर्ण तपास केला जाईल,' असं चिकुंगा यांनी सांगितलं.


दक्षिण आफ्रिकेत अनेक रस्ते अपघात


"आम्ही कायमच फारच सक्रीय राहण्याबरोबरच जबाबदारीने ड्रायविंग करण्याचं आवाहन करतो. कारण सध्या ईस्टर विकेंडमध्ये अधिक लोक रस्ते मार्गाने प्रवास करत आहेत," असंही चिकुंगा म्हणाल्या. रस्ते अपघात आणि सुरक्षेसंदर्भात दक्षिण आफ्रिकेची कामगिरी फारच सुमार आहे.


राष्ट्रपतींनीही दिला सुरक्षित प्रवासाचा सल्ला


आपल्या ईस्टर विशेष संदेशामध्ये दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामफोसा यांनी नागरिकांना, 'ईस्टरदरम्यान सुरक्षितपणे प्रवास करण्यास प्राधान्य द्या. आपल्या देशातील रस्त्यावरील जखमींची संख्या चिंता वाढवणारी नसावी,' असं सांगितलं आहे.