पाकिस्तानात सत्ता बदलाचे वारे तर अमेरिका निवडणूक प्रचार इस्त्रायलच्या रस्त्यांवर
पाकिस्तानात सत्ता बदलाचे वारे वाहू लागले आहेत. अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा रणसंग्राम आता इस्त्रायलच्या रस्त्यांवर पाहायला मिळत आहे.
इस्लामाबाद / वॉशिंग्टन : पाकिस्तानात सत्ता बदलाचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे इम्रानखान यांचं पद धोक्यात सापडलंय. लष्कराच्या मदतीनं चालणारं सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करत नाही. असा पाकिस्तानचा इतिहास आहे. दरम्यान पाकिस्तानातील ११ विरोधीपक्ष सरकारविरोधात एकत्र आले असून, गुजरावाला इथं भव्य रॅली करणार आहेत. इम्रान खान यांचं सरकार जास्त काळ टिकणार नसून, जानेवारी पूर्वीच सत्तापालट होईल असा दावा तिथल्या विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.
तर अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा रणसंग्राम आता इस्त्रायलच्या रस्त्यांवर पाहायला मिळतोय. रिपब्लिकन आणि डेमॉक्रॅटस या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तेल अविवच्या रस्त्यांवर प्रचार सुरू केलाय. अमेरिकन-इस्त्रायली नागरिक त्यांचे लक्ष्य आहेत. डेमॉक्रॅटसनी तर या नागरिकांना बॅलेट बॉक्सच्या कुरियर सर्विससाठी ४० टक्क्यांची सूट देऊ केलीय. जेरुसलेमला इस्त्रायलची राजधानी घोषित करणाऱ्या ट्रम्पविषयी द्विनागरिकत्व असलेल्या इस्त्रायली नागरिकांमध्ये विशेष भावना आहेत.
पुढच्या वर्षी टोकियो ऑलिंपिक
काहीही झालं तरी पुढच्या वर्षी टोकियो ऑलिंपिक पार पाडणारच असा निर्धार जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी केलाय. २०२० मध्ये कोरोनाच्या संकटामुळे हा क्रीडाकुंभमेळा होऊ शकला नाही. तर अद्याप कोरोना नियंत्रणात आलेला नसल्यानं पुढच्या वर्षीच्या आयोजनावरही टांगती तलवार आहेच. २०२१मध्ये ऑलिंपिक आणि पॅरालिंपिकचं आयोजन म्हणजे संपूर्ण मानवजातीनं कोरोनावर मिळवलेल्या विजयाचं प्रतिक असेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.
जपान सरकारचा नवा निर्णय
२०११ च्या त्सुनामीमध्ये उद्ध्वस्त झालेल्या फुकुशिमा न्युक्लियर प्लांटमधील रेडिओअॅक्टीव्ह पाणी समुद्रात सोडण्याचा निर्णय जपान सरकारने घेतलाय. या महिन्यातच याची अधिकृत घोषणा केली जाईल. आतापर्यंत या प्लांटमधून १ कोटी टन दुषित पाणी जमा करण्यात आलंय. अद्याप अंतिम निर्णय झालेला नसला तरी इतक्या मोठ्या प्रमाणात हे पाणी साठवून ठेवणं धोकादायक ठरू शकते त्यामुळे सरकारवर या पाण्याच्या विल्हेवाटीसाठी दबाव वाढत आहे.
थायलंडमध्ये असंतोष वाढतोय
थायलंडमध्ये सध्या तिथल्या राजघराण्याविरोधातला असंतोष वाढतोय. बुधवारी थाई राणी सुथिदा हिचा ताफा रस्त्यावरून जात असताना आंदोलकांपैकी काही जणांनी तीन बोटांनी सॅल्यूट करून राजघराण्याच्या अवास्तव खर्चाविरोधात घोषणाबाजी केली होती. फुटेजच्या आधारे पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केलीय. त्या दोघांना याप्रकरणी अगदी मृत्यूदंडही ठोठावला जाऊ शकतो. मात्र आता यावरूनही सरकारवर बरीच टीका होत आहे.
इटलीमध्ये पुन्हा कोरोनाचं संक्रमण
इटलीमध्ये पुन्हा कोरोनाचं संक्रमण वाढू लागल्याने दक्षिण इटलीमधल्या शाळा पुन्हा बंद करण्यात आल्यात. अनेक स्थानिक प्रशासनांनी हा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदी मुलांना ऑनलाईन शिक्षणच घ्यावं लागणार आहे. इटलीमध्ये गुरुवारी नवे ८ हजार ८०४ कोरोनाबाधित आढळून आलेत. पंतप्रधान कॉन्टे यांनी मात्र हा निर्णय शेवटचा पर्याय नाही असं म्हटले आहे