नवाझ शरीफांच्या संपत्तीच्या जप्तीचे आदेश, बँक अकाऊंट सील
पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय.
कराची : पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय.
देशाच्या सर्वोच्च भ्रष्टाचारविरोधी संस्थेनं शरीफ आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या बँक अकाऊंट सील केलेत. इतकरच नाही तर त्यांच्या संपत्तीवर जप्तीचे आदेशही देण्यात आलेत. नॅशनल अकाऊंटेबिलिटी ब्युरोनं लाहोरच्या जवळच रायविंडमध्ये शरीफ यांच्या घरावर समन्स आणि संपत्ती जप्तीची नोटीस धाडले आहेत.
शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या प्रकरणात सुनावणी करणाऱ्या इस्लामाबादच्या न्यायालयानं शरीफ, त्यांची मुलगी मरियम तसंच जावई सफदर यांना २६ सप्टेंबर रोजी कोर्टासमोर हजर होण्यासाठी समन्स धाडले आहेत.
शरीफ यांच्या पत्नी कुलसूम सध्या कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी लढा देत आहेत. हेच कारण पुढे करत शरीफ मुलांसह लंडनमध्ये वास्तव्य करत आहेत. पत्नीची तब्येत सुधारल्यानंतर शरीफ पाकिस्तानात परततील, असा विश्वास सत्ताधारी 'पीएमएल-एन'नं व्यक्त केलीय. परंतु, सध्या वाढत चाललेल्या अडचणी पाहता शरीफ यांना पाकिस्तानात परतणं कठिण होऊन बसलंय.