पाकिस्तान घाबरला; मसूद अजहर, हाफिज सईदला भूमिगत राहण्याच्या सूचना
पुलवामामध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्याने जवानांवर आत्मघाती हल्ला केला होता.
कराची/दिल्ली - पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाल्यानंतर आता पाकिस्तानने दहशतवादी गटांचे म्होरके मसूद अजहर आणि हाफिज सईद यांना पुढील काही दिवस सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी न होण्याची सूचना दिली आहे. त्याचबरोबर सुरक्षित स्थळी भूमिगतपणे राहण्यासही सांगण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तान सरकारकडूनच या दोन्ही म्होरक्यांना या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही सभेमध्ये सहभागी होऊ नका, सार्वजनिक कार्यक्रमात जाऊ नका. सुरक्षित ठिकाणी घरातच राहा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पुलवामामध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्याने जवानांवर आत्मघाती हल्ला केला होता. मसूद अजहर याच संघटनेचा म्होरक्या आहे. भारताविरुद्ध गरळ ओकण्यात आणि पाकिस्तानमधील तरुणांची माथी भडकाविण्याचे काम मसूद अजहर गेल्या काही वर्षांपासून करीत आहे. त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. पण चीनकडून याला विरोध होत आहे. पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने मंगळवारी एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये दहशतवाद्यांना पाकिस्तानी सेना आणि तेथील आयएसआय या गुप्तहेर संघटनेचे पाठबळ असल्याचे पुरावे असल्याचे म्हटले होते. पाकिस्तानी सेना आणि आयएसआयच्या माध्यमातूनच काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांना स्फोटके पुरविली जातात, असे भारतीय लष्कराने म्हटले होते. पुलवामा हल्ल्यामागेही पाकिस्तानी सेना आणि आयएसआयचा हात आहे, असेही भारतीय लष्कराने स्पष्ट केले होते.
काश्मीरमध्ये जे कोणी शस्त्र हातात घेईल आणि आत्मसमर्पण करण्यास तयार होणार नाही, त्यांना गोळ्या घालण्यात येतील, असेही भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे.