Pakistan Election : पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पक्ष या निवडणुकीत मागे पडल्याचे दिसत आहे. आतापर्यंत 98 जागांचे निकाल जाहीर झाले असून, त्यापैकी इम्रान खान यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षाला 47 जागा मिळाल्या आहेत. इम्रान खान तुरुंगातूनच नवाझ शरीफ यांच्या पक्षासोबत लढा देत आहेत. इम्रानचे उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. अशातच इम्रान यांच्या पक्षानेही केंद्रात सरकार स्थापनेचा दावा केला आहे. दरम्यान, दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा दल्हा सईद लाहोर एनए-122 या जागेवरून निवडणुकीत पराभूत झाल्याची माहिती समोर आली आहे. तल्हा सईदला  केवळ 2042 मते मिळाली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानमध्ये निवडणुकांसाठी मतदान संपल्यानंतर मतमोजणी सुरू आहे. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता मतदानाला सुरुवात होऊन सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान सुरू होते. निवडणूक आयोगाने 18 तासांच्या विलंबानंतर अधिकृत निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानच्या सभागृहात एकूण 336 जागा आहेत. त्यापैकी 265 जागांसाठी यंदा निवडणूक झाली. उर्वरित जागा राखीव आहेत. प पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन), पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) या तीन पक्षांमध्ये मुख्य लढत पाहायला मिळत आहे.


पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी लाहोरमधून यास्मिन रशीद यांच्यावर 55,000 हून अधिक मतांनी विजय मिळवला आहे.
दरम्यान, इम्रान खान यांच्या पक्षाने पाठिंबा दिलेल्या उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे. मतदान केंद्रांमध्ये हेराफेरी आणि निकाल जाणूनबुजून रोखल्याचा आरोपही इम्रान खान यांच्या पक्षाने केला आहे.


मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदचा मुलगा लाहोरमधील त्याच्या जागेवरून निवडणूक हरला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान लतीफ खोसा यांनी त्यांचा पराभव केला. खोसा हे एक लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले. तल्हा सईद हा हाफिज सईदचा उत्तराधिकारी मानला जातो. भारत सरकारनेही तल्हाला दहशतवादी घोषित केले आहे. भारतात झालेल्या अनेक हल्ल्यांमागे तल्हाचा हात असल्याचं म्हटलं जातं.


सुरुवातीला पाकिस्तानात तल्हा सईदच्या निवडणूक लढवण्यास विरोध झाला होता. मात्र, तल्हाने निवडणूक लढवली. इम्रान खानही याच जागेवरून निवडणूक लढवणार असल्याचे यापूर्वी सांगितले जात होते. मात्र, न्यायालयाने त्यांना निवडणूक लढविण्यास बंदी घातली. तीन प्रकरणांमध्ये अटक आणि शिक्षा झाल्यामुळे इम्रान खान निवडणूक लढवू शकले नाहीत. नवाझ शरीफ देखील दोन जागांवरून निवडणूक लढवत होते. त्यांना केवळ एका जागेवर विजय मिळाला.