इस्लामाबाद: भारताशेजारी असलेल्या देशात पेट्रोलपेक्षाही महाग तेलाचे दर आहेत. या देशात पेट्रोल परवडेल पण तेल नाही असं म्हणायची वेळ आली आहे. पाकिस्तानमध्ये सध्या महागाई शिगेला पोहोचली आहे. पाकिस्तानात महागाईमध्ये 12.66% वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खाण्यापिण्याच्या किंमतींवर आणि पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर झाला आहे. शनिवारी पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 10 रुपयांपेक्षा जास्त वाढ केली. त्यानंतर सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सतत वाढत जाणाऱ्या किमतींमुळे पाकिस्तानी लोकांच्या जीवनात अडचणी निर्माण झाल्या आहेत. पाकिस्तानमध्ये पेट्रोलची किंमत 137.79 रुपये आणि हायस्पीड डिझेलची किंमत 134.48 रुपये झाली आहे. एक दिवसापूर्वी, सरकारने विजेच्या किंमतीतही 1.39 रुपयांची वाढ केली होती. जी पुढील महिन्यापासून लागू होईल. 


वाढत्या महागाईवर स्पष्टीकरण देताना इम्रान खान सरकारने सांगितलं की, सरकारवर खूप आर्थिक दबाव आहे. तरीही जनतेला दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींशी संबंधित अधिसूचना जारी करताना पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, ऑक्टोबर 2018 नंतर तेलाच्या किंमती जगात सर्वाधिक आहेत. तेल प्रति बॅरल सुमारे 85 डॉलर विकत आहे. 


पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी या दरवाढीला विरोध केला आहे. सप्टेंबर महिन्यात पेट्रोल 9 रुपयांनी वाढवलं होतं. त्यापाठोपाठ आता खाद्यतेलाचे दर वाढल्याने नागरिकांना समस्यांना निर्माण होत आहे. गेल्या आठवड्यात वाढत्या महागाईमुळे टोमॅटो, बटाटा, तूप, मटण आणि लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (LPG) सिलेंडरसह 22 वस्तू महाग झाल्या आहेत. घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 43.96 रुपये प्रति किलो, तूप 2.99 रुपये प्रति किलो, तर मटण 4.58 रुपये प्रति किलो वाढली आहे.