केनिया : प्लॉस्टिकच्या पिशव्या पर्यावरणाला हानी पोहचवतात, हे आपण सगळे जाणतोच. २ दिवसांपूर्वीच प्लॉस्टिकच्या पिशव्यांमुळे मुंबईच्या रस्त्यांवर आलेल्या पुराला आपण सामोरे गेलो. तरी देखील प्लॉस्टिकचा वापर आपल्याकडे पूर्णपणे टाळला जात नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु, पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यासाठी केनियामध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजे या देशात प्लॉस्टिकच्या पिशव्यांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. आणि त्यात जर कोणी प्लॉस्टिकच्या पिशव्या वापरताना आढळल्यास त्यांना २४ लाख ३३ हजारांहून अधिक किंमतीचा दंड होऊ शकतो. हा दंड भरणे शक्य नसल्यास ४ वर्षांसाठी कारागृहात रहावे लागू शकते. प्लॉस्टिकच्या पिशव्यांवर निर्बंध घालण्याचा हा निर्णय पर्यावरणाच्यादृष्टीने फायद्याचे ठरु शकते असेही केनियाच्या सरकारने सांगितले आहे.


प्लॉस्टिकच्या पिशव्या वापरावर त्याचबरोबर उत्पादनावर देखील बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे देशातील तब्बल ८० हजार कर्मचारी बेरोजगार होण्याची शक्यता आहे. ‘बीबीसी’ने दिलेल्या वृत्तानुसार केनियामध्ये एका महिन्याला जवळपास २ कोटी ४० लाख पिशव्या वापरल्या जातात. जगातील अनेक देशांमध्ये प्लॉस्टिक पिशवी वापरण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे केनियामध्ये घेतला गेलेला निर्णय जगात महत्त्वाचा मानला जात आहे. सर्व दुकानदार आणि व्यावसायिकांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच त्यांच्याकडून प्लॅस्टिकच्या पिशव्या देखील जप्त करण्यात आल्या आहेत.


या निर्णयामुळे केनियामध्ये आता नागरिकांना घराबाहेर पडताना स्वतःची पिशवी बाळगण्याची सवय लागली आहे. त्याचबरोबर कापडी, कागदी अशा विविध प्रकारच्या पिशव्या वापरात आल्या आहेत. याशिवाय, विदेशी नागरिकांना विमानतळावरच आपल्याकडील प्लॉस्टिकच्या पिशव्या जमा कराव्या लागणार आहेत.