बिश्केक: किर्गीस्तानमधील बिश्केक येथील एससीओ परिषदेत शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एकमेकांना दुरूनच अभिवादन केले. मात्र, दोन्ही नेत्यांची औपचारिक भेट झालेली नाही. तसेच या दोघांत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्टीकरण परराष्ट्र मंत्रालायकडून देण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिश्केक परिषदेतील मोदी आणि इम्रान खान यांच्या उपस्थितीमुळे भारत-पाकिस्तानमध्ये चर्चा झाल्याच्या बातम्या सुरू होत्या. किर्गिस्तानमध्ये मोदी आणि इम्रान खान तब्बल सातवेळा आमनेसामने आले. मात्र, अखेरच्यावेळी अभिवादन वगळता मोदींनी इम्रान खान यांच्याकडे ढुंकूनही पाहिलेले नाही. 


पुलवामातील हल्ला आणि त्यानंतर बालाकोट एअर स्ट्राईकनंतर दोन्ही देशातील संबंध ताणले गेले आहेत. यानंतर भारताने सातत्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला वेगळे पाडण्याची रणनीती अवलंबिली होती. पाकिस्तानकडून जोवर दहशतवादी कारवायांवर लगाम घातला जात नाही तोवर पाकिस्तानशी कुठलीही चर्चा करायची नाही, अशी भारताची भूमिका आहे. 


त्यामुळे बिश्केक परिषद मोदींनी विविध देशांच्या राष्ट्र प्रमुखांशी भेटीगाठी घेतल्या. मात्र इम्रान खान यांना भेटणं मोदींनी टाळले. दोघांमध्ये ना भेट झाली, ना नजरानजर. परिषदेत मोदी इम्रान खान यांच्यापासून काही अंतरावरच बसले होते. तसेच गाला कल्चरल कार्यक्रमातही मोदी-इम्रान एकमेकांच्या जवळजवळ होते. मात्र, दोघांमध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही. दरम्यान, ही परिषद संपल्यानंतर पंतप्रधान मोदी शनिवारी पहाटे भारतामध्ये परतले.