न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज संध्याकाळी संयुक्त राष्ट्र संघटनेत  (UNGA) भाषण करणार आहेत. त्यानंतर थोड्या वेळात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे भाषण याच मंचावरून होणार आहे. पण इम्रान खान हे भाषण देत असताना पंतप्रधान मोदी तिथे भाषण ऐकण्यास उपस्थित राहणार नाहीत.  पंतप्रधान मोदी स्वत:चे भाषण संपवून निघून जाणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी हे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साधारण ७.५० वाजता भाषण करतील. याच्या ३० मिनिटांनंतर इम्रान खान यांचे भाषण होणार आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ आणि २०१५ मध्ये UNGA मध्ये भाषण केले होते. संयुक्त राष्ट्र महासभेतील हे त्यांचे तिसरे भाषण असेल. दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर हे त्यांचे पहिलेच भाषण आहे.



'पाक'चा बहिष्कार 


संयुक्त राष्ट्र संघाच्या इतर दक्षिण आशियाई क्षेत्र सहयोग संघटनेत  (SAARC) परराष्ट्र मंत्र्यांची बैठक सुरु आहे. यामध्ये भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या भाषणावर पाकिस्तानने बैठकी दरम्यान बहिष्कार टाकला आहे. जयशंकर हे गुरुवारी बैठकीला संबोधित करत होते. पण पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यापासून दूर राहीले. भारतीय मंत्र्याचे भाषण संपताच पाकिस्तानी मंत्री बैठकीत पुन्हा सहभागी झाले. 


२०१४च्या भाषणात मोदींनी योग दिनाची संकल्पना मांडली होती. त्यानंतर २०१५पासून जगभरात २१ जून हा योग दिन म्हणून पाळला जाऊ लागला. त्यामुळे आजच्या भाषणाकडेही जगाचं लक्ष असणार आहे. 


दहशतवादाविरोधात जगानं एकत्र येण्याची मागणी भारतानं विविध मंचांवरून आतापर्यंत वारंवार केली आहे. त्याचा पुनरुच्चार आजच्या भाषणातही अपेक्षित आहेच. शिवाय काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर सरकारने घातलेल्या निर्बंधांविषयी मोदी बोलतात का? याकडे सर्वांचं लक्ष आहे. 


याशिवाय पर्यावरण बदल आणि संवर्धनाविषयी भारतानं केलेलं काम आणि भविष्यात जगभरात याविषयीची जागरुकता वाढवण्यासाठी आपले प्रयत्न या मुद्द्यांवरही मोदींच्या भाषणात भर देण्यात येणार आहे.