स्त्री-पुरूष पगारात भेदभाव, बीबीसीच्या महिला संपादिकेचा राजीनामा
हा राजीनामा त्यांनी स्त्री आणि पुरूष यांच्यात भेदभाव करत दिल्या जाणाऱ्या असमान वेतनाला कंटाळून दिला आहे.
बीजिंग : जगभारातील प्रसारमाध्यमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या बीबीसी या वृत्तसेवेत एक खळबळजनक घटना घडली आहे. बीबीसीच्या चीनमधील संपादिका कॅरी ग्रेसी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी स्त्री आणि पुरूष यांच्यात भेदभाव करत दिल्या जाणाऱ्या असमान वेतनाला कंटाळून दिला आहे.
बीबीसी पाळते ‘गुप्त कायदेशीर वेतन संस्कृती’
स्वत: ग्रेसी यांनीच आपल्या राजीनाम्याबाबत प्रतिक्रीया दिली आहे. बीबीसीतील वेतनात असमानता असून, या संस्थेत ‘गुप्त कायदेशीर वेतन संस्कृती’ पाळली जाते. त्यामुळे स्त्री-पूरूष यांच्यातील वेतनात भेदभाव केला जातो. या प्रकाराला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचे कॅरी ग्रेसी यांनी म्हटले आहे. बीबीसीमध्ये दीड लाख पाऊंडपेक्षा जास्त पगार अनेक कर्मचाऱ्यांना आहे. मात्र, त्या कर्मचाऱ्यांपैकी दोन तृतीयांश हे पुरूषच आहेत. असे असतानाही आम्ही कर्मचाऱ्यांमध्ये स्त्री आणि पुरूष असा भेदभाव करत नाही, असे बीबीसी सांगते, असेही कॅरी म्हणतात.
पदाचा राजीनामा दिला पण, संस्था सोडली नाही
दरम्यान, कॅरी ग्रेसी यांनी पदाचा राजीनामा दिला. पण, याचा अर्थ त्यांनी बीबीसी ही संस्था सोडली असा नाही. तर, मी केवळ पदाचा राजीनामा दिला आहे. मी संस्थेसोबत कार्यरत असेन असेही ग्रेसी यांनी म्हटले आहे. बीबीसीमध्ये वेतनात असमानता असते त्यामुळे आपण राजीनामा दिल्याचे त्या सांगतात. याबाबत त्यांनी एक खुले पत्र लिहीले आहे. या पत्रातून पुढे आलेल्या माहितीनुसार, कॅरी ग्रेसी यांनी गेल्या आठवड्यापासून बीबीसीचे संपादकपद सोडले आहे.