लंडन : Russia Ukraine Conflict : रशियाने जीवघेणे हल्ले सुरू केल्यावर आता जगानेही रशियाविरोधात दंड थोपटले आहेत. (Russia Ukraine War) युक्रेन युद्धात थेट इतर देशांनी सैन्य उतरवलं नसले तरी युक्रेनच्या मदतीसाठी मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि इतर मदत पाठवायला सुरूवात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युक्रेन रशियाचा तुफान भडीमार सहन करतंय. रशियाच्या आक्रमक हालचालींवर आता केवळ नजर ठेवून चालणार नाही हे जगाच्या आता लक्षात आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत रशिया विरोधी ठरावावर रशियावर सणकून टीका झाली. त्यानंतर आता युरोपमधल्या काही देशांनी युक्रेनला थेट शस्त्रास्त्र पाठवायला सुरूवात केली आहे.



युरोपिय युनियनकडून युक्रेनला 70 फायटर विमाने पाठवण्यात येणार आहेत. तर बल्गेरियाने युक्रेनला 16 मिग- 29, 14 सुखोई-25 देण्याचा निर्णय घेतलाय. पोलंडने 28 मिग-29 तर स्लोवाकियाने 12 मिग-29 देण्याचा निर्णय घेतला आहे. 


यातली गंमतशीर बाब अशी की ही सगळी विमानं रशियन बनावटीची आहेत. रशियाच्या मिकोयान कंपनीची मिग विमाने अमेरिका आणि नाटो वगळता बहुतेक देशांच्या ताफ्यात आहेत. हीच विमाने आता रशियाविरोधात लढण्यासाठी दिली जात आहेत. 


ऑस्ट्रेलियाने युक्रेनला आर्थिक आणि लष्करी सामग्रीचा पुरवठा सुरू केलाय. शस्त्र खरेदीसाठी ऑस्ट्रेलियाने 5 कोटी डॉलर्स देण्याचा निर्णय घेतलाय. फिनलंडने 2500 असॉल्ट रायफली, 1 लाख 50 हजार बुलेट्ची कार्टरिज, 1500 अँटी टँक मिसाईल्स, 70 हजार MRE रायफली पुरवठा सुरू केलाय. 



तैवाननेही रशियाला स्विफ्ट पेमेंट प्रणालीतून हद्दपार केले आहे. तसेच युक्रेनला वैद्यकीय मदतीचा ओघ सुरू केलाय. भारतानेही युक्रेनला जीवनावश्यक सामग्री आणि वैद्यकीय मदतीचा पुरवठा सुरू केलाय. अमेरिकेने जीवनावश्यक वस्तू पुरवठ्यासाठी तब्बल 640 कोटी डॉलर्सची मदत जाहीर केलीय. इंग्लंडने 4 कोटी पौडांची मदत युक्रेनला जाहीर केलीय. स्विडनने 5000 रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र, 5000 हेल्मेट, 5000 बुलेटप्रुफ जॅकेट्स पाठवले आहे. 


रशियाची आक्रमकता कोणालाही सहन होणारी नाही. रशियाला रोखण्यासाठी आता सर्वतोपरी प्रयत्न होणं गरजेचं आहे. नाही तर त्याचे परिणाम केवळ युक्रेनला नाही तर जगाला भोगावे लागणार आहेत, अशी प्रतिक्रिया आता अनेक देशांतून उमटत आहे.