8,891 फूटांचे अंतर आणि 3 सेकंद...; युक्रेनच्या स्नायपरने रशियन सैनिकाला ठार करत केला विक्रम
युक्रेनियन स्नायपरने लांब पल्ल्याचे लक्ष्य भेदल्यानंतर रशियन सैनिक जमिनीवर पडल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आले आहे
Russia Ukraine War : रशिया युक्रेन युद्धाने (russia ukraine war) गेल्या काही महिन्यांपासून जगभरात गोंधळ उडाला आहे. इतक्या महिन्याभरानंतरही बलाढ्य रशियाला युक्रेनवर ताबा मिळवता आलेला नाही. चिकटाने युक्रेन रशियाचा प्रतिकार करत आहे. अशातच काही दिवसांपूर्वी दक्षिण युक्रेनच्या खेरसन शहरातून सैन्य मागे घेत असल्याची घोषणा रशियाने केली. युक्रेनच्या सैन्यापुढे रशियाला प्रतिकार करता आला नाही आणि खेरसन (kherson) सोडण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यानंतर युक्रेनियन नागरिकांकडून त्यांच्या सैनिकांचे स्वागत करण्यात येत आहे. मात्र या दरम्यान एका स्नायपर सैनिकाने ( Ukrainian sniper) सर्वांचेच लक्ष्य वेधलं आहे.
खेरसनमधून रशियन सैन्याला हुसकावल्यानंतर युक्रेनच्या लष्कराने (ukraine army) आणखी एक मोठा विक्रम केला आहे. कीवच्या लष्करी प्रमुखांच्या म्हणण्यानुसार, युक्रेनियन स्नायपरने सर्वात लांब गोळी झाडून रशियन सैनिकाला ठार केले आहे. सर्वात लांबचे लक्ष्य गाठण्याची ही इतिहासातील दुसरी घटना आहे. युक्रेनिय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार युक्रेनच्या स्नायपरने 2,710 मीटर अंतरावर म्हणजे सुमारे 8,891 फूट अंतरावर एका रशियन सैनिकाला ठार केले. युक्रेनच्या लष्कराने याचा व्हिडीओही जारी केला आहे.
कुशल युक्रेनियन स्नायपरने लांब पल्ल्याचे लक्ष्य भेदल्यानंतर रशियन सैनिक जमिनीवर पडल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आले आहे. युक्रेनच्या सशस्त्र दलाच्या स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्सच्या कार्यालयाने सांगितले की, हा स्नायपर सर्वात लांब हल्ल्याच्या जागतिक विक्रम करण्याच्या अगदी जवळ आला आहे. "आमच्या विशेष दलाच्या स्नायपरने 2,710 मीटर (8,891 फूट) अंतरावरुन रशियन सैनिकाला मारून टाकले. हे अंतर आता जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे," असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
काय आहे व्हिडीओमध्ये?
युक्रेन आर्म्ड फोर्सने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये एक सैनिक झाडांमधून चालताना दिसत आहे. गोळी झाडल्याच्या तीन सेकंदांनंतर, थर्मल लाईट हलते ज्यामुळे रायफलमधून गोळीबार झाल्याचे स्पष्ट होते. दुसऱ्यांदा स्नायपरने गोळीबार केल्यावर मदत करण्यासाठी धावणारा रशियन सैनिक खाली पडतो. मात्र, हा व्हिडीओ कुठला आहे, कोणते शस्त्र किंवा दारूगोळा वापरला गेला याबाबत युक्रेनच्या लष्कराने फारशी माहिती दिलेली नाही. त्यामुळे या व्हिडीओबाबत शंका उपस्थित होत आहे.
व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी तो खोटा असल्याचे म्हटले आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथे थर्मल स्कोप रशियन सैनिकांना शोधू शकत नाही तसेच रायफलमधून गोळी झाडल्याचा आणि सैनिक पडण्याचा दोघांच्या अंतरानुसार खूपच कमी होता, असा दावा नेटकऱ्यांनी केला आहे. याआधी 2017 मध्ये जेव्हा कॅनेडियन स्नायपरने हा विक्रम केला तेव्हा त्याला लक्ष्य गाठण्यासाठी सुमारे 10 सेकंद लागले होते, परंतु युक्रेनच्या सैनिकाने हे अंतर तीन सेकंदात कापले आहे.