कोरोना पॉझिटिव्ह आल्याने `या` देशाचे पंतप्रधान पदावरुन बाजूला
कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान पदापासून तात्पुरतं हटण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्युरो रिपोर्ट : रुसचे पंतप्रधान मिखाइल मुशुस्तिन (Mikhail Mishustin) यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तात्पुरतं पंतप्रधान पदावरुन बाजूला करण्यात आलं आहे.
गुरुवारी रात्री जनतेला संबोधित करताना रुसचे पंतप्रधान मिखाइल मुशुस्तिन यांनी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं राष्ट्रीय टीव्हीवर जाहीर केलं. त्यांनी याबाबतची माहिती रुसचे राष्ट्रपती व्लादमीर पुतिन (Vladimir Putin) यांना दिली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान पदापासून तात्पुरतं हटण्याचा निर्णय घेतला आहे.
मिखाइल पंतप्रधान पदावरुन बाजूला झाल्यानंतर, रुसचे उप पंतप्रधान आंद्रे वेलूसोव, पंतप्रधान पदाचा पदभार सांभाळणार असल्याचं, मिखाइल मुशुस्तिन यांनी सांगितलं.
कोरोना व्हायरसचा मोठा फटका रुसलाही बसला आहे. रुसमध्ये आतापर्यंत 1 लाख 6 हजार 498 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. रुसमध्ये आतापर्यंत जवळपास 1 हजार 73 लोकांचा मृत्यू झाला आहे.
जगात आतापर्यंत 32 लाख 73 हजार 415 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर जगात आतापर्यंत 2 लाख 32 हजार 200 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत सर्वाधिक 62 हजार 890हून अधिकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर इटलीत 27 हजार 965हून अधिक जण दगावले आहेत.
गेल्या 24 तासांत जगात 81 हजार 953 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.