Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन या दोन देशांत सुरु झालेल्या युद्धाचा (Russia Ukraine War) आजचा तिसरा दिवस आहे. हे युद्ध संपणार की आणखी चिघळणार यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणारा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युद्धाच्या पार्श्वभूमीवर फ्रांसचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मोठे संकेत दिले आहेत. जगावर तिसऱ्या महायुद्धाचं संकट आहे, हे युद्ध प्रदीर्घ काळासाठी चालणार आहे, दीर्घकालीन युद्धासाठी तयार राहा असं मॅक्रॉन यांनी म्हटलं आहे.


रशियन फौजांचं तीव्र आक्रमण
रशियन फौजांनी राजधानी कीव्ह जिंकण्यासाठी जोरदार हल्ले सुरू केले आहेत. रशियन फौजा राजधानीवर मोठी बॉम्बफेक करत आहेत. मिसाईल्सचाही मारा केला जात आहे. कीव्ह विमानतळाजवळ एका भल्यामोठ्या रहिवासी इमारतीवर रशियाने मिसाईल्सद्वारे हल्ला केला. यात इमारतीचं मोठं नुकसान झालं.


झेलेन्स्की यांचा देश सोडण्यास नकार
रशियन सैन्य कीव्हमध्ये दाखल झाल्यावर आता अध्यक्ष झेलेन्स्की यांचा जीव धोक्यात आलाय. झेलेन्स्की यांना रशियाकडून अटक होण्यापूर्वी किंवा ते मारले जाण्याआधी त्यांची सुटका करण्याची तयारी अमेरिकेने केल्याची माहिती आहे. मात्र झेलेन्स्की यांनी देश सोडण्यास नकार दिल्याची माहिती समोर येतेय.  


दोन्ही देशांकडून दावे-प्रतिदावे
रशिया युक्रेन यांच्या युद्धात दोन्ही बाजूंनी मोठे दावे प्रतिदावे केले जात आहेत. युद्ध आता तिस-या दिवशीही सुरूच आहे.  युक्रेनचे 821 युद्धतळ बेचिराख केल्याचा रशियाचा दावा आहे. तर 14 रशियन विमानं, 8 हेलिकॉप्टर, 102 रणगाडे उडवले असा युक्रेनने दावा केलाय. एवढंच नाही. तर रशियाचे 300 सैनिक युद्धबंदी केले तर 3500 रशियन सैनिक मारले असाही दावा युक्रेनने केलाय. 


युक्रेनमध्ये युद्धामुळे मोठ्या प्रमाणात युक्रेनिअन नागरिकांनी देश सोडायला सुरूवात केलीय. जवळपास 50 हजार युक्रेनच्या नागरिकांनी गेल्या 48 तासांत देश सोडल्याची माहिती आहे.