महिला कर्मचाऱ्याकडून गर्भपातासंबंधी ट्विट; कंपनीने दिली शिक्षा
अँजेला विल्यमसन (वय ३९) असे या महिलेचे नाव असून, ती क्रिकेट ऑस्ट्रेलियाची तास्मेनिया येथील Government Relation Manager होती.
सिडनी: ऑस्ट्रेलियातील एका महिला कर्मचाऱ्याने गर्भपातावेळी मिळणाऱ्या सेवेबाबत टीकात्मक ट्विट केले. परिणामी ती काम करत असलेल्या कंपनीने तिला कामावरून काढून टाकले. ही घटना तास्मेनिया येथे घडली. ही महिला क्रिकेट ऑस्ट्रेलियासाठी (सीए) काम करत होती. अँजेला विल्यमसन (वय ३९) असे या महिलेचे नाव असून, ती क्रिकेट ऑस्ट्रेलियाची तास्मेनिया येथील Government Relation Manager होती.
सरकारविरोधात ट्विट
अँजेलाने म्हटले आहे की, तिने सरकारविरोधात ट्विट केल्याने तिला नोकरीवरून काढण्यात आले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या स्पष्टीकरणात केवळ इतकेच म्हटले आहे की, ते तीव्र स्वरूपाची टीका सहन करत नाहीत. तास्मेनिया येथे सर्जरीद्वारे गर्भपात करणारे एकमेव क्लिनीक नुकतेच बंद झाले. त्यावरून हा वाद पेटला आहे. वाढता खर्च आणि कमी मागणी यांमुळे हे क्लिनीक बंद करण्यात आले. ज्यामुळे अँजेला विल्यम्सन आणि अन्य महिलांना गर्भपात करण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी जावे लागले.
कंपनीविरूद्ध करणार कायदेशीर कारवाई
तास्मेनिया येथे गर्भपातासाठी कमी खर्चात सुविधा उपलब्ध नाही. त्यातच हे क्लिनिक बंद झाल्याने महिलांच्या समस्या आणखी वाढल्या आहेत. या प्रकारामुळे चिडलेल्या अँजेलाने क्रिकेट ऑस्ट्रेलियाविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. अँजेलाने एका खासदाराने संसदेत केलेल्या भाषणावर टीका करत ट्विटमध्ये म्हटले होते की, 'संसदेमध्ये आतापर्यंतची सर्वात बेजबाबदार आणि बकवास आणि तितकेच बाष्कळ भाषण होते'. क्रिकेट ऑस्ट्रेल्याने अँजेला विल्यम्सनला २९ जूनला दिलेल्या टर्मिनेशपत्रात या ट्विटचाही उल्लेख केला आहे.