सौदी अरेबियात नोकरीसाठी जात असाल तर ही बातमी वाचा! यापुढे आधी फक्त...
सौदी अरेबिया (Saudi Arabia) आता प्रत्येक क्षेत्रात भूमीपुत्रांना संधी देण्याचा प्रयत्न करत आहे. क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या व्हिजनचा हा भाग आहे. याच पार्श्वभूमीवर सौदीने एक निर्णय घेतला आहे जो तिथे नोकरीच्या शोधात जाणाऱ्या भारतीयांवर प्रभाव टाकू शकतो.
सौदी अरेबियाने (Saudi Arabia) खासगी क्षेत्रातील इंजिनिअरिंगच्या नोकऱ्यांमध्ये आपल्या लोकांना म्हणजेच भुमीपूत्रांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियाने आपल्या लोकांसाठी या क्षेत्रात आरक्षण जाहीर केलं आहे. खासगी इंजिनिअरिंग नोकऱ्यांमध्ये भुमीपूत्रांसाठी 25 टक्के आरक्षण लागू केलं आहे. रविवारी हा निर्णय लागू झाला असून, यामागे सौदीच्या नागरिकांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी देण्याचा उद्देश आहे. पण याचा परिणाम सौदीत नोकरीच्या शोधात जाणाऱ्या भारतीयांवर होऊ शकतो.
मनुष्यबळ आणि सामाजिक विकास मंत्रालयाच्या या योजनेंतर्गत अभियांत्रिकी क्षेत्रातील सौदी नागरिकांची संख्या वाढेल, असा विश्वास आहे. सौदी अरेबियाची अधिकृत प्रेस एजन्सी सौदी प्रेस एजन्सीने सांगितलं आहे की, मंत्रालयाने नगरपालिका, ग्रामीण व्यवहार आणि गृहनिर्माण मंत्रालयाच्या सहकार्याने अभियांत्रिकी नोकऱ्यांमध्ये 25 टक्के स्थानिकीकरण कोटा लागू केला आहे.
सौदी प्रेस एजन्सीने म्हटलं आहे की, 'हे धोरण सौदीतील पुरुष आणि महिलांना अधिक चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून देईल.' या नवीन धोरणामुळे प्रत्येक खासगी क्षेत्रातील कंपनी ज्यामध्ये पाच किंवा त्याहून अधिक इंजिनिअर्स काम करत आहेत, त्यावर परिणाम होईल. नियमांचे पालन न करणाऱ्या कंपन्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही सौदी अधिकाऱ्यांनी दिला आहे.
क्राऊन प्रिन्स सलमान यांचं 'व्हिजन 2030'
सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स त्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प 'व्हिजन 2030' अंतर्गत सौदी अरेबियाच्या प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र बदल करत आहेत. त्याचाच भाग म्हणून सौदी अरेबियाच्या विविध क्षेत्रांतील नोकऱ्यांमध्ये सौदी नागरिकांना प्राधान्य दिलं जात आहे. व्हिजन 2030 अंतर्गत, सौदीतील बेरोजगारी 7 टक्क्यावर आणण्याचं उद्दिष्ट आहे. याअंतर्गत सौदी अरेबियाला आपल्या उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये विविधता आणून कच्च्या तेलावरील आपलं अवलंबित्व कमी करायचं आहे.
भारतीयांवर होणार प्रभाव
सौदी अरेबियाचा प्रायव्हेट इंजिनिअरिंग सेक्टरमधील आऱक्षणाचा निर्णय अनेक भारतीयांवर प्रभाव पाडेल. याचं कारण दरवर्षी मोठ्या संख्येने भारतीय नोकरीच्या शोधात सौदी अरेबियात जातात. नोकरीच्या शोधात जाणाऱ्यांमध्ये कौशल्य आणि निमकौशल्य कामगारांचा समावेश असतो ज्यात इंजिनिअर्सही असतात.
2022 मध्ये सौदी अरेबियाने म्हटलं होते की, नोकरीसाठी येणाऱ्या भारतीयांची संख्या 5 पटीने वाढली आहे. 2022 मध्ये 1,78,630 भारतीय नोकरीसाठी सौदीला गेले होते. आता सौदीने आपल्या नागरिकांसाठी खासगी अभियांत्रिकी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद केली आहे, ज्यामुळे भारतीयांना या क्षेत्रातील संधी कमी होतील.