भारताच्या मदतीसाठी आणखी एक देश आला पुढे, 80 मेट्रिक टन ऑक्सीजनचा पुरवठा
भारतात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ऑक्सीजनची मागणी प्रचंड वाढली असताना मदत
दुबई : भारतात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ऑक्सीजनची मागणी प्रचंड वाढली आहे. सौदी अरेबिया भारताला 80 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवतो. अदानी ग्रुप आणि लिंडे कंपनीच्या सहकार्याने हा ऑक्सिजन भारतात पाठवला गेला आहे.
रियाधमधील इंडियन मिशनने ट्विट केले आहे की, भारताची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी 80 मेट्रिक टन ऑक्सिजन पाठविण्यात अदानी ग्रुप आणि मेसर्स लिंडे यांच्यात झालेल्या सहकार्याचा भारतीय दूतावासाला अभिमान आहे. मदत, समर्थन आणि सहकार्याबद्दल सौदी अरेबियाच्या आरोग्य मंत्रालयाचे मनापासून आभार.
यासंदर्भात अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ट्विट केले, रियाधमधील भारतीय दूतावास यांना धन्यवाद. शब्दांपेक्षा अधिक काम बोलते. आम्ही सध्या जगभरातून ऑक्सिजन मिळवण्याच्या कामात गुंतलो आहोत. 80 टन ऑक्सिजनची पहिली खेप सध्या दमाम ते मुंद्रा दरम्यान आहे.
कोरोनावर उपचार घेत असलेल्या इराकी राजधानी बगदादमधील रुग्णालयात ऑक्सिजन टँक फुटल्यामुळे आग लागली होती. या आगीत 82 जणांचा मृत्यू आणि 110 हून अधिक लोकं जखमी झाले. इराकच्या गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, या भीषण अपघातानंतर देशातील सर्व रुग्णालयांमध्ये सुरक्षा उपायांचा आढावा घेण्यास सांगितले आहे. शनिवारी दियाला ब्रिज भागातील इब्न अल खातिब रुग्णालयात ही आग लागली.
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक आपला जीव वाचवण्यासाठी खिडकीतून उडी मारत होते. आगीत जखमी झालेल्या सर्व रूग्णांना इतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इराकच्या मानवाधिकार आयोगाने ट्विट केले आहे की, तेथे 28 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. 'या आगीत दोनशे लोकांना रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले, असे आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे.