`मक्केतील मशिदीवर हल्ला झाला तेव्हा...`; सौदीच्या मुस्लिम नेत्यासमोरच NSA डोवाल यांचा सल्ला
Ajit Doval On Saudi Arabia Attack 1979: अजित डोवाल यांनी मुस्लिम वर्ल्ड लीगच्या महासचिवांसमोरच मक्केतील ग्रॅण्ड मशिदीवर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत या हल्ल्यानंतर सौदी अरेबियामध्ये काय बदल झाला याबद्दलचं भाष्य केलं. डोवाल यांनी दहशतवाद हा कोणत्याही धर्माशी संबंधित नसतो असंही म्हटलं.
Saudi Arabia Islamic Leader About Ajit Doval: मुस्लिम वर्ल्ड लीगचे महासचिव आणि सौदी अरेबियाचे माजी न्यायमंत्री मोहम्मद बिन अब्दुलकरीम अल-ईसा सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी इस्लामिक कल्चर सेंटरमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमाला अल-ईसांबरोबर भारताचे मुख्य सुरक्षा सल्लागार अजित डोवालही उपस्थित होते. डोवाल यांनी या कार्यक्रमामध्ये दहशतवाद हा कोणत्याही एका धर्माशी संबंधित नाही असं म्हटलं. दहशतवाद हा कोणत्याही धर्माशी संलग्न नसल्याने आध्यात्मिक आणि धार्मिक नेत्यांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी हिंसेच्या मार्गाने जाणाऱ्यांना विरोध केला पाहिजे, अशी अपेक्षाही डोवाल यांनी व्यक्त केली. याचवेळी डोवाल यांनी सौदी अरेबियामध्ये मक्केतील मशिदीवर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला.
हिंसेला विरोध करायला हवा
या कार्यक्रमामध्ये धार्मिक नेते, अभ्यासक आणि राजकीय अधिकाऱ्यांना संबोधित करताना अजित डोवाल यांनी, "दहशतवाद हा काही कोणत्या विशिष्ट धर्माशी निगडीत विषय नाही. लोकांना चुकीच्या मार्गाला जाण्यास भाग पाडलं जातं. अशावेळेस आध्यात्मिक आणि धार्मिक नेत्यांचं हे कर्तव्य आहे त्यांनी हिंसेचा मार्ग अवलंबलेल्या लोकांना विरोध करण्याची आवश्यकता आहे. हिंसेचा मार्ग निवडणारी व्यक्ती कोणत्याही धर्माची, कशावरही श्रद्धा ठेवणारी किंवा कोणत्याही विचारधारेशी संबंधित असली तरी विरोध व्हायला हवा," असं म्हटलं.
मक्केतील हल्ल्याचा उल्लेख
1979 साली सौदी अरेबियामधील मक्का येथे ग्रॅण्ड मशिदीवर दहशतवादी हल्ला झाल्याचा उल्लेख करत डोवाल यांनी या घटनेमुळे सौदी अरेबियाचा दहशतवादाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलल्याचं सांगितलं. या हल्ल्यामुळे दहशतवादाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आल्याचं नमूद केलं. या हल्ल्यानंतर सौदी अरेबियाला आपल्या सुरक्षा यंत्रणांबरोबरच परराष्ट्र धोरणामध्ये बदल करण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही, असं डोवाल म्हणाले. पुढे बोलताना डोवाल यांनी एकत्र मिळून दहशतवादाविरुद्ध लढणं महत्त्वाचं असल्याचा सल्ला सर्वच राष्ट्रांना दिला.
नेमका कधी झालेला हल्ला?
20 नोव्हेंबर 1979 साली इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र जागा मानल्या जाणाऱ्या मक्केमध्ये जगभरातील लाखो मुस्लिम धर्मीय एकत्र आले होते. सकाळी नमाज झाल्यानंतर मशिदीमध्ये आधीपासूनच लपून बसलेल्या शेकडो सशस्त्र हल्लेखोरांनी लाखो लोकांना ओलीस ठेवलं. या हल्लेखोरांनी तब्बल 14 दिवस या लोकांना ओलीस ठेवलं. सौदी सरकारला हल्लेखोरांविरोधात कारवाई करण्यासाठी पवित्र अशा अल हरम मशिदीमध्ये घुसून लष्करी कारवाई करावी लागली होती.
फ्रान्स, पाकिस्तानने पाठवलेली मदत
यावेळेस फ्रान्स आणि पाकिस्तानने सौदी अरेबियाच्या मदतीसाठी कमांडो टीम पाठवल्या होता. 14 दिवसांच्या लष्करी कारवाईनंतर 4 सप्टेंबर रोजी हा संघर्ष संपला होता. या लष्करी कारवाईमध्ये शेकडो हल्लेखोर मारले गेले. जिवंत राहिलेले हल्लेखोर शरण आले.
का करण्यात आलेला हल्ला
मक्केतील ग्रॅण्ड मशिदीवर ताबा मिळवणारे सर्व हल्लेखोर अल-जमा अल-सलाफिया अल-मुहतासिबा (जेएएसएम) संघटनेचे होते अशी माहिती समोर आली. जेएसएम संघटनेचा सौदी अरेबियातील आधुनिकीकरणाला विरोध होता. देश आधुनिक झाल्यास सौदी अरेबियामधील सामाजिक आणि धार्मिक अध:पतन होईल असा या संघटनेचा दावा होता.
सार्वजनिक फाशी
सौदी अरेबिया सरकारने 63 हल्लेखोरांना जिवंत पकडलं. त्यानंतर 9 जानेवारी 1980 रोजी सार्वजनिकरित्या सर्व हल्लोखोरांना फासावर लटकवलं होतं. या हल्लानंतर सौदी अरेबियामध्ये अनेक अमुलाग्र बदल झाल्याचं सांगितलं जातं.
डोवाल म्हणाले भारत करतोय नेतृत्व
जागतिक स्तरावर दहशतवादाचं आव्हान असल्याचं सांगताना डोवाल यांनी, "देशामध्ये आणि देशाबाहेर सुरक्षा आणि स्थैर्य कायम ठेवण्यासाठी भारत हिंसा, अंमली पदार्थ आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींविरोधात आणि संघटनांविरोधातील लढ्याचं नेतृत्व करत आहे," असंही म्हटलं.