सौदी अरेबियाचे दोन ऐतिहासिक निर्णय, जगातून सर्वत्र कौतुक
सौदी अरेबियाचा ऐतिहासिक निर्णय
नवी दिल्ली : सौदी अरेबियाने अल्पवयीन गुन्हेगारांना फाशीची शिक्षा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. शनिवारी सौदी अरेबियाने सार्वजनिकपणे चाबकाची शिक्षा देखील रद्द केली आली. मानवाधिकारांवरील सौदी अरेबियाची प्रतिमा आतापर्यंत खराब आहे. गेल्या काही वर्षांपासून सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान देशाची प्रतिमा सुधारण्यासाठी सतत सुधारणावादी पावले उचलत आहेत.
सौदी अरेबियाच्या रॉयल डिक्रीचा संदर्भ देताना मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष अवद अलवाड यांनी म्हटलं की, केवळ अल्पवयीन गुन्हेगारांना फाशीची शिक्षा दिली जाणार नाही. फाशीची शिक्षा देण्याऐवजी अल्पवयीन गुन्हेगारांना आता जास्तीत जास्त 10 वर्षे तुरूंगवासाची शिक्षा देण्यात येणार आहे.
सौदी अरेबियासाठी हा अत्यंत महत्वाचा दिवस असल्याचे अवाद यांनी म्हटलं आहे. हा शाही फर्मान आम्हाला आधुनिक कायदा व सुव्यवस्था राबविण्यात मदत करेल.
सौदी अरेबियाच्या या निर्णयामुळे शिया समाजातील सहा जणांना दिलासा मिळणार आहे. ज्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. अरब स्प्रिंग चळवळीदरम्यान झालेल्या सरकारविरोधी निदर्शनांमध्ये सामील असल्याबद्दल त्यांना दोषी ठरविण्यात आले होते. त्यावेळी त्यांचे वय 18 वर्षापेक्षा कमी होते. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार सदस्यांनी गेल्या वर्षी सौदी अरेबियाला त्यांची फाशी थांबविण्याचे आवाहन केले होते.
सौदी अरेबियामध्ये वहाबी इस्लामचे वर्चस्व आहे. सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान सौदीला आधुनिक राज्यात रूपांतर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये वॉशिंग्टन पोस्टच्या पत्रकार जमाल खाशोगजीच्या हत्येप्रकरणी सौदीची भूमिका प्रश्नचिन्हात पडली आहे आणि या सुधारवादी चरणांच्या माध्यमातून आपली प्रतिमा बदलण्यासाठी क्राउन प्रिन्सही अशीच पावले उचलत आहेत.
गुन्हेगारांना शिक्षा करण्यात सौदी अरेबिया जगात आघाडीवर आहे. दहशतवाद, बलात्कार, दरोडा, अंमली पदार्थांच्या तस्करीसह सर्व प्रकरणांमध्ये फाशीची तरतूद आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, 2019 मध्ये सौदी अरेबियाने 187 लोकांना फाशीची शिक्षा सुनावली. अधिकृत आकडेवारीनुसार जानेवारीपासून एकूण 12 जणांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे.
सौदी अरेबियामधील खटल्याच्या पारदर्शकतेविषयी मानवाधिकार संघटनांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत कारण इस्लामिक कायद्यानुसार येथे राजेशाही शासन आहे.
शनिवारी सौदी अरेबियानेही चाबकाने फटके मारण्याची शिक्षा ही रद्द केली आहे. ही अमानुष शिक्षा संपविण्याची मागणी जगभरातील देशांकडून केली जात होती. सन 2014 मध्ये सौदी ब्लॉगर रॅफ बादावी यांना चाबकाने फटके मारण्याचं प्रकरण चांगलंच चर्चेत आले होते. इस्लामचा अपमान केल्याबद्दल या ब्लॉगरला दोषी ठरविण्यात आले आणि त्याला 10 वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा आणि 1000 फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली.
एका सौदी अधिकाऱ्याने ब्रिटीश वृत्तपत्र 'द गार्डियन'ला सांगितले की, गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांसाठी अजूनही हुदुद किंवा कठोर शिक्षा चालूच राहील. हुदुदसाठी हे महत्वाचे आहे की एकतर गुन्हेगार स्वत: गुन्ह्याची कबुली देईल किंवा प्रौढ मुस्लिम त्याबद्दल साक्ष देतील. या प्रकरणात, हुदूद शिक्षा फारच कमी प्रकरणांमध्ये दिली जाते.