Riyadh Fashion Week: सौदी अरबच्या इतिहासात पहिल्यांदाच फॅशन विक आयोजित केला जाणार आहे. 20 ऑक्टोबरपासून रियाद फॅशन विकला सुरुवात होणार आहे. या फॅशन विकमध्ये तीसहून अधिक ब्रँड आपले डिझाइन प्रदर्शित करणार आहेत. 20 ते 23 ऑक्टोबरपर्यंत या फॅशन विकचे आयोजन करण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कट्टर व रुढीवाढी समजल्या जाणाऱ्या सौदी अरेबियामध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे महत्त्व वाढताना दिसत आहे. यापूर्वी 2018 मध्ये अशाच प्रकारच्या एका खासगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्याबाबत पूर्णपणे गुप्तता पाळण्यात आली होती. त्याचबरोबर अशा कार्यक्रमांत कोणाला प्रवेश देण्यात यावा याबाबतही काही नियम आखले होते. मात्र, यावेळी फॅशन वीकचे आयोजन सौदी सरकारच्या मदतीने केले जाणार आहे. 


सौदी अरबची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे खनिज तेलावर अवलंबून आहे. अशावेळी तेल निर्यातीव्यतिरिक्त इतर गोष्टीतूनही अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी सौदी सरकार प्रयत्नशील आहे. क्राइन प्रिन्स मोहमद्द बिन सलमान यांच्या नेतृत्वाखाली सौदी अरेबियातील जागतिक गरजा आणि भविष्याच्या दृष्टीने संस्कृती आणि फॅशन क्षेत्राला स्वतःला विकसित करण्याचा प्रयत्न सौदीकडून करण्यात येत आहे. त्यामुळं या फॅशन वीकचे भव्य आयोजन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सौदी अरेबियातील कट्टरपथी या निर्णयाचा व या बदलाचा  विरोध करताना दिसून येत आहेत. 


द स्टेट ऑफ फॅशन इन द किंगडम ऑफ सौदी अरब 2023 च्या एका रिपोर्टनुसार, गेल्या काही वर्षांपासून सौदी अरेबियात फॅशन उद्योगाचा विस्तार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. 2022 मध्ये सौदी अरेबियाच्या एकूण जीडीपीपैकी फॅशन उद्योगाचे एकूण 1.4 टक्के योगदान होते. म्हणजेच सौदी अरेबियामध्ये फॅशन उद्योगाचा व्यापार जवळपास 12.5 अरब अमेरिकन डॉलर इतका होता. त्याचबरोबर सौदी अरेबियातील एकूण कामगारांपैकी 2 टक्के लोक म्हणजेच दोन लाख तीस हजार लोक फॅशन उद्योगात काम करतात. 


दरम्यान, या रिपोर्टनुसार, 2021 ते 2024 या आर्थिक वर्षात सौदी अरेबियाचा जीडीपी फॅशन विश्वामुळं 48 टक्क्यापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. यामुळं सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची शक्यता आहे. 


सौदी अरेबियात अनेक बदल


मोहम्मद बिन सलमान क्राइन प्रिन्स झाल्यानंतर सौदी अरेबियामध्ये अनेक सामाजिक बदल झाले आहेत. ज्या सौदी अरेबियामध्ये नेहमीत महिलांना बुरखा, नकाब किंवा हिजाबमध्ये राहण्याची सक्ती होती. तिथे आता सौदीतील महिलांना गाडी चालवण्याची परवानगी मिळाली आहे. त्याचबरोबर एकटीने प्रवास करण्याची मुभाही देण्यात आली आहे.