पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी
शाहिद खाकान अब्बासी हे ४५ दिवसांसाठी पंतप्रधान असतील. अब्बासी हे सध्या पाकिस्तानचे पेट्रोलिअम मंत्री आहेत.
इस्लामाबाद : नवाझ शरीफ यांच्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहिद खाकान अब्बासी विराजमान होणार आहेत. शाहिद खाकान अब्बासी हे ४५ दिवसांसाठी पंतप्रधान असतील. अब्बासी हे सध्या पाकिस्तानचे पेट्रोलिअम मंत्री आहेत.
अब्बासी हे पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारणार असून नवाझ शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ हे खासदार म्हणून निवडून येईपर्यंत अब्बासी हे पंतप्रधानपदी कायम असतील.
सत्ताधारी ‘पाकिस्तान मुस्लीम लीग- नवाझ’ पक्षाच्या शनिवारी दोन बैठका पार पडल्या. नवाझ शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली या दोन्ही बैठका पार पडल्या. या बैठकीत पंतप्रधानपदाविषयी चर्चा झाली. पहिली बैठक अनौपचारिक होती. तर दुसरी बैठक पक्षाच्या संसदीय समितीची पार पडली.
संसदेत शरीफ यांच्या पीएमएल-एन यांच्या पक्षाकडे बहुमत असल्याने पंतप्रधानपदाला तूर्तास तरी धोका नाही. शरीफ यांचे बंधू आणि सध्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री असलेले शाहबाज शरीफ हे शरीफ यांचे उत्तराधिकारी असतील. पण शाहबाज यांना आधी खासदार म्हणून निवडून यावे लागेल. यासाठी नवाझ शरीफ यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवरुन शाहबाज शरीफ निवडणूक लढवतील.
हा मतदारसंघ शरीफ कुटुंबीयांचा बालेकिल्ला असून शाहबाज शरीफ यांचा विजय निश्चित मानला जात आहे. संसदेत निवडून गेल्यावर शाहबाज शरीफ पंतप्रधानपदी विराजमान होतील. मात्र या कालावधीत शाहिद खाकान अब्बासी हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळतील.