या देशात ना मुलांची कमी, ना मुलींची... तरीही `या` कारणासाठी लग्न कोणालाच करायचं नाही
लग्नाचे प्रमाण कमी होण्याचे कारण येथील तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
मुंबई : चीनमध्ये कोरानाच्या नव्या व्हेरिएंटची एन्ट्री झाली आहे. परंतु यादरम्यान येथील एक विचित्र बातमी समोर आली आहे. जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. असे सांगितले जात आहे की, तेथील लोकसंख्या ही झपाट्याने कमी होत आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये आतापर्यंत सर्वात कमी विवाहांची नोंद झाली आहे. चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने शेअर केलेल्या डेटावरून असे दिसून येते की, गेल्या वर्षी एकूण 7.63 दशलक्ष जोडप्यांनी लग्नासाठी नोंदणी केली होती. हा आकडा साल 1986 नंतरचा सर्वात कमी आहे.
चीनचे अधिकृत वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या अहवालात म्हटले आहे की, 2021 मध्ये 7.63 दशलक्ष जोडप्यांनी लग्नासाठी नोंदणी केली. त्याच वेळी, 2020 मध्ये ही संख्या 8.13 दशलक्षपेक्षा जास्त होती. म्हणजेच अवघ्या एका वर्षात त्यात लक्षणीय घट झाली आहे.
खरेतर साल 1986 पासून चीनमध्ये लग्नाचे रेकॉर्ड ठेवण्यास सुरुवात झाली, तेव्हापासून 2021 चा आकडा सर्वात कमी झाला आहे.
अधिकृत न्यूज वेबसाइट Yikai Global नुसार, 2013 मध्ये लग्नासाठी नोंदणी करणाऱ्यांची संख्या खूप जास्त होती, पण तेव्हापासून हा आकडा सातत्याने घसरत आहे. 2013 मध्ये एकूण 13.46 जोडप्यांनी लग्नासाठी नोंदणी केली होती.
मंत्रालयाने म्हटले आहे की शांघाय, झेजियांग, फुजियान, हेबेई आणि हुनान प्रांतांमध्ये विवाह दर सर्वात कमी आहेत. दुसरीकडे, तिबेट, किंघाई, गुइझोउ, अनहुई आणि निंग्झियामध्ये सर्वाधिक विवाहांची नोंद झाली आहे.
लग्नाची संख्या का कमी होत आहे?
लग्नाचे प्रमाण कमी होण्याचे एक कारण म्हणजे महिलांचे लग्नावरील अवलंबित्व कमी झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. महिला अधिक अभ्यास करून आर्थिकदृष्ट्या मजबूत होत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना चांगले जीवन जगण्यासाठी कोणत्याही आधाराची गरज नसते.
विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठाचे संशोधक यी फुक्सियान यांनी साउथ चायना मॉर्निंग पोस्टला सांगितले की, चीनच्या कोविड महामारीच्या निर्बंधांमुळे लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये वादाचे किंवा भांडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. ज्यामुळे देशात घटस्फोटाच्या घटनांमध्येही घट झाली आहे. 2021 मध्ये, 2.14 दशलक्ष जोडप्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला, तर 2020 मध्ये ही संख्या 3.73 दशलक्ष होती.