सियारालोन : अपंगत्व आल्यावर लोकं नाऊमेद होतात. काही लोकं नैराश्याच्या गर्तेत जातात. अशा लोकांनी एकदा सिआरा लिओनमध्ये एकदा जरुर जावं... इथं अपघातानं दिव्यांगपणा आलेले तरुण आजही कुबड्यांसह फुटबॉल खेळतात. त्यांचं खेळणं धडधाकट माणसांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी मारलेली प्रत्येक किक नव्या उमेदीचं प्रतिक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आफ्रिका खंडातल्या सिआरालोन हे आता कुठं यादवीतून सावरतंय. पण यादवीनं जे इथल्या पिढीला दिलं ते अतिशय भयंकर आहे. गृहयुद्धाच्या काळात सिआरालोनमध्ये लाखो भूसुरुंग पेरण्यात आले. या भूसुरुंगाच्या स्फोटात विरोधी सैन्याचे अनेक लोक मारले गेले पण त्याहीपेक्षा भूसुरुंग स्फोटात मारल्या गेलेल्या निष्पापांची संख्या मोठी होती. कित्येक जण कायमचे अधू झाले. 


दिव्यांगपणा आला पण ते निराश झाले नाही. नव्या उमेदीनं ते आयुष्य जगतायत. त्यांची प्रत्येक किक याची साक्ष देते. फ्लाईंग स्टार्स हा ३० दिव्यांग खेळाडूंचा संघ आहे. यातल्या प्रत्येक खेळाडूत जबरदस्त इच्छाशक्ती आहे, चिकाटी आहे. 


मैदानात कुबड्यांच्या सहाय्यानं उतरतात पण रोनाल्डो आणि मेस्सीच्या तोडीचा त्यांचा मैदानात वावर असतो. प्रतिस्पर्धी टीमवर हल्लाबोल करणारी फळी, बचाव फळी आणि गोलकिपर यांचा खेळ पाहून कोणीही तोंडात बोटं घातल्यावाचून राहणार नाही. दिव्यांग असूनही मैदानावर हुकूमत गाजवणाऱ्या या फ्लाईंग स्टार्सच्या जिद्दीला सलाम...