Twitterचा मोठा निर्णय; ६ हजार अकाउंट्स बंद
ही खाती अनेक विषयांवर दिशाभूल करणार्या बातम्या आणि स्पॅम पसरवत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : ट्विटरने सौदी 'सरकार- समर्थित' जवळपास सहा हजार (5,929) अकाउंट्स बंद केले आहेत. ट्विटरच्या माध्यमातून या अकउंट्सचा वापर सौदी अरब, सरकार-समर्थित माहिती हाताळण्यासाठी करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं आहे. बंद करण्यात आलेले सर्व अकाउंट्स वाइड रेंज ऑफ टॉपिक्समध्ये स्पॅम गोष्टींचे प्रतिनिधित्व करणार्या ८८ हजार खात्यांपैकी एक होती.
बंद करण्यात आलेल्या या अकाउंट्सवरुन ट्विटरच्या धोरणांचं उल्लंघन केलं असल्याने ट्विटरवरुन अशी अकाउंट्स पूर्णपणे बंद केल्याची माहिती ट्विटरने दिली आहे. या सर्व अकाउंट्सवरुन गैरसमज आणि अफवा पसरवल्या जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. ट्विटरवरुन काढून टाकलेल्या ८८ हजार अकाउंट्सच्या डेटाचा खुलासा केला नसल्याचंही ट्विटरकडून सांगण्यात आलं आहे.
सौदी अरब सरकारने, ट्विटरकडून घेण्यात आलेल्या या निर्णयावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ट्विटरकडून, ही खाती अनेक विषयांवर दिशाभूल करणार्या बातम्या आणि स्पॅम पसरवत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वी अमेरिकी अधिकाऱ्यांकडून तीन सौदी नागरिकांविरोधात हेरगिरी केल्याचा आरोप लावण्यात आला होता. यापूर्वीही ट्विटरने सौदी अरेबियाची काही ट्विटर अकाउंट्स बंद केली होती.