Coca Cola मध्ये विषारी घटक? कंपनीनं तडकाफडकी परत मागवल्या सर्व Bottles

Coca Cola: शीतपेयांची विक्री करणाऱ्या कोका कोला या आघाडीच्या कंपनीनं सोमवारी तडकाफडकी सर्व उत्पादनं परत मागवण्याचा निर्णय घेतला.
Coca Cola: शीतपेयांच्या उत्पादनामध्ये अतिशय महत्त्वाचा वाटा असणाऱ्या कोका कोला या कंपनीनं आजवर अनेक उत्पादनं बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिली. जागतिक स्तरावक कोका कोलाच्या या उत्पादनांना ग्राहकपसंतीसुद्धा मिळाली. पण, आता मात्र हीच कंपनी मोठ्या संकटात सापडली असून, सोमवारी म्हणजेच 27 जानेवारी 2025 रोजी कंपनीनं आपली सर्व उत्पादनं, कोक ड्रींक्सच्या बाटल्या परत मागवल्या.
युरोपातील या घटनेचा हवाला देत BBC नं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार कंपनीच्या फँटा (Fanta),मिनीट मेड (Minute Maid), स्प्राइट (Sprite), कोक (Coke) आणि ट्रॉपिको (Tropico) या पेयांमध्ये तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्लोरेट कंटॅमिनेशन आढळून आल्याचं म्हटलं गेलं.
काचेच्या बाटल्या आणि टीनमध्ये असणारे हे सॉफ्ट ड्रींक नोव्हेंबर महिन्यापासून नेदरलँड्स, ब्रिटन, बेल्जियम, जर्मनी, लक्झमबर्ग आणि फ्रान्स इथं विकले जात होते. कंपनीच्या माहितीनुसार 2024 या वर्षात कंपनीकडून विकण्यात आलेल्या कोका कोला कॅन आणि काचेच्या बाटल्यांमध्ये क्लोरेट धोकादायक पातळीवर असल्याचं आढळून आलं आणि एकच खळबळ माजली.
क्लोरेट नेमकं किती धोकादायक?
क्लोरेट हे क्लोरिनपासून तयार होणाऱ्या किटकनाशकांचच एक बायप्रोडक्ट असल्याचं सांगितलं जातं. याचा वापर सहसा जलशुद्धीकरण आणि अन्नपदार्थांवरील रासायनिक क्रियांमध्ये केला जातो. 'यूरोपियन फूड सेफ्टी अथॉरिटी'च्या 2015 मधील अहवालानुसार दीर्घकाळासाठी क्लोरेटचा वापर केला गेल्यास आरोग्यावर त्याचे विपरित परिणाम दिसून येतात. आयोडिनची कमतरता असणाऱ्या मुलांमध्ये याचा सर्वाधिक परिणाम दिसत असून, एका दिवसातच याचा वापर शरीरासाठी विषारी ठरू शकतो.
हेसुद्धा वाचा : पृथ्वी नव्हे, ब्लू मार्बल! NASA नं टीपला अवकाशातील आणखी एक अद्भूत नजारा
कोका कोला युरोपॅसिफिक पार्टनर्स, बेल्जियमनं 'AFP'ला दिलेल्या माहितीनुसार नेमके किती प्रोडक्ट परत मागवण्यात आले आहेत हा आकडा अद्याप समोर येऊ शकलेला नाही. दरम्यान, कंपनीनं येत्या काळात आणखीही काही उत्पादनं माघारी घेण्याचा निर्णय घेत भविष्यातील संकट रोखण्यासाठी तातडीनं काही पावलं उचलली आहेत.