`अगं तू बरी होशील`, म्हणत मुलांचा कॅन्सरग्रस्त आईसाठी मोठा त्याग, Video पाहून रडूच येईल
कॅन्सर झाल्याने आभाळ कोसळलेल्या आपल्या आईचं मनोबल वाढवण्यासाठी मुलांनी आपलेही केस कापून टाकले. हा व्हिडीओ Reddit ला शेअर करण्यात आला असून, व्हायरल झाला आहे.
आई म्हणजे सर्वस्व असते. आपल्या मुलांवर कोणतंही संकट येऊ नये म्हणून एकीकडे बाप झटत असताना, आई आपल्या पंखाखाली त्यांना मायेची ऊब देत असते. मुलांना आयुष्यात सर्व काही मिळावं, ते यशस्वी व्हावेत यासाठी आई-वडील झटत असतात. मुलांना नेहमी आनंद मिळावा यासाठी त्यांची धडपड सुरु असते. पण नेहमी आपल्या सुखाचा विचार करणाऱ्या आईवरच दु:खाचा डोंगर कोसळतो, तेव्हा मात्र ती एकटी पडू नये ही जबाबदारी मुलांची असते. आपलं हे प्रेम, जबाबदारी आपल्या कृत्यांमधून नेहमी दिसत असते. दरम्यान, अशाच प्रकारे आपल्या आईप्रती प्रेम व्यक्त करणाऱ्या मुलांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत.
कर्करोगाशी लढा देत असलेल्या आपल्या आपल्या आईचं मनोबल वाढवणाऱ्या मुलांचा हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. एकजुटीने उभे राहत सर्व मुलं आईसाठी आपले केस कापून टाकत मुंडण करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ Reddit ला शेअर करण्यात आला असून, व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 'आईच्या कॅन्सरच्या प्रवासात मुलं तिला साथ पाठिंबा देत आहेत,' अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.
व्हिडीओच्या सुरुवातीला महिला केस कापण्यासाठी खुर्चीवर बसल्याचं दिसत आहे. यावेळी तिच्या डोळे पाण्यान भरलेले असतात. महिलेचा पती तिचं चुंबन घेत तिला आधार देतो. यानंतर तिची तिन्ही मुलं तिला मिठी मारत प्रेम व्यक्त करतात. यानंतर एक मुलगा आईचे केस कापण्यास सुरुवात करतो. पण नंतर काही क्षणातच मागे उभा राहिलेला मुलगा ट्रिमरने आपले केस कापू लागतो. हे पाहिल्यानंतर महिला त्याला असं करु नको सांगण्याचा प्रयत्न करत आणखी भावूक होते.
यानंतर महिलेची इतर दोन्ही मुलंही आपले केस कापायला घेतात. हे पाहिल्यानंतर महिला आणखीनच भावूक होते. महिला सतत मुलांना असं करु नका सांगत थांबण्याचा प्रयत्न करते. पण मुलं पूर्ण केस कापून टाकतात आणि आईचं मनोबल वाढवतात.
हा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. याशिवाय व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंटही करण्यात आल्या आहेत.
'तुम्ही एक मुलगा केस कापताना घाबरलेला दिसत असल्याचं पाहू शकता. पण त्याला हे चांगल्यासाठी करत आहोत याची माहिती आहे,' असं एका युजरने म्हटलं आहे. तर एकाने हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आपण प्रचंड भावूक झाल्याचं म्हटलं आहे. 'मुलाने केस कापणं सुरु करताच माझ्या डोळ्यात पाणी आलं,' असं त्याने म्हटलं आहे.