रस्त्यावर नग्न होऊन फिरणे माझा हक्क; `त्या` व्यक्तीला हायकोर्टाचेही समर्थन
हायकोर्टाचा एक निर्णय सध्या चर्चेचा विषय बनला आहे. कोर्टाने या व्यक्तीच्या बाजूने निकाल देत सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे
Viral News : जगातल्या बहुतेक देशात तिथल्या राज्यघटनेने त्यांच्या नागरिकांना काही मूलभूत अधिकार नक्कीच बहाल केलेले आहेत. कधी हे अधिकार योग्यरित्या वापरले जातात तर कधी त्याचा गैरवापर केला जातो. पण कधी कधी न्यायालय असे काही निर्णय देते की आश्चर्य व्यक्त केले जातं. स्पॅनिश हायकोर्टाचा (Spanish high court) असाच एक निर्णय सध्या चर्चेचा विषय बनला आहे. स्पेनच्या (Spain) कोर्टाने एका व्यक्तीच्या बाजूने निकाल देत सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.
स्पेनमधल्या अलेजांद्रो कोलोमार (Alejandro Colomar) नावाच्या व्यक्तीने आपल्याला पर्यटनाच्या ठिकाणी, चित्रपट, कॅफे, स्विमिंग पूल, गेम पार्लर यांसारख्या मनोरंजनासाठी लोक जिथे जातात अशा सर्व ठिकाणी जायचे आहे, असे म्हणत कोर्टात आपली बाजू मांडली होती. पण गोम अशी होती की, कोलोमरला या सर्व ठिकाणी नग्न फिरायचे होते. होय खरंच... कोलोमर नावाच्या व्यक्तीची इच्छा आहे की त्याला आयुष्यभर नग्न राहायचे आहे. त्याला बाहेर लोकांमध्ये फिरतानाही नग्न राहायचे आहे.
काही दिवसांपूर्वी अलेजांद्रो कोलोमर स्पेनमधील व्हॅलेन्सिया ( Valencia) शहरात कपड्यांशिवाय फिरत होता. याप्रकरणी पोलिसांनी त्याला पकडून दंड ठोठावला होता. या विरोधात अलेजांद्रो कोलोमर हायकोर्टात गेला होता. स्पेनमध्ये 1988 पासून सार्वजनिक ठिकाणी नग्नता कायदेशीर आहे. या प्रकरणात महत्त्वाची बाब म्हणजे हायकोर्टाने कोलोमरच्या बाजूने निकाल दिला आहे. या सुनावणीवेळी अलेजांद्रोने कोर्टात नग्नपणे उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला होता.
याप्रकरणी हायकोर्टाने याप्रकरणी सुनावणी घेत कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवत कोलोमारच्या बाजूने निकाल दिला आहे. कनिष्ठ न्यायालयानेही कोलोमारला ठोठावलेला दंड रद्द केला होता. या निर्णयाविरोधात दंड ठोठावणाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे हायकोर्टाने या प्रकरणी सुनावणी घेत कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत दंड ठोठावणाऱ्यांनी याचिका फेटाळून लावली आहे. मात्र यावेळी हायकोर्टाने न्यायालयाने, स्पॅनिश कायद्यात असलेल्या सार्वजनिक ठिकाणी नग्नतेबाबतच्या कायदेशीर त्रुटी मान्य करत त्याबाबत भाष्य केले. सुनावणीवेळी हायकोर्टात पोहोचलेला अलेजांद्रो कोलोमारने पायात केवळ बोट घातले होते.
नग्न फिरण्याला मोठा पाठिंबा
नग्न फिरण्यामुळे मला ठोठवलेला हा दंड माझ्या वैचारिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन करतो. 2020 पासून सार्वजनिक ठिकाणी मी नग्न फिरत आहे. माझ्या नग्न फिरण्याला तिरस्कारापेक्षा जास्त पाठिंबा मिळाला आहे. मला एकदा विरोधही झाला होता. त्यावेळी मला चाकूने धमकावले गेले होते, असे अलेजांद्रो कोलोमारने रॉयटर्सला सांगितले.
माझ्यावर केलेला आरोप चुकीचा
"मला दंड भरायला काही अडचण नाही. पण त्यांनी माझ्यावर असभ्य वर्तनाचा आरोप केला. शब्दकोशानुसार, या शब्दाचा अर्थ लैंगिक प्रक्रियेशी आहे. पण मी असे काही करत नव्हतो. स्पेनमध्ये 1988 पासून सार्वजनिक नग्नता कायदेशीर आहे. त्यामुळे नग्न रस्त्यावर फिरता येते. पण वॅलाडोलिड आणि बार्सिलोना यांनी नग्न फिरण्याबाबत स्वतःचे कायदे आणले आहेत," असेही कोलोमारने सांगितले.