Sri Lanka Crisis: आंदोलकांच्या समर्थनात माजी क्रिकेटपटू ही उतरले रस्त्यावर
श्रीलंकेत आता माजी क्रिकेटपटूही आंदोलनाचं समर्थन करताना दिसत आहेत.
कोलंबो : भारताचा शेजारील देश श्रीलंकेतील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. आर्थिक विवंचनेमुळे हताश झालेले आंदोलक शनिवारी राष्ट्रपती भवनात पोहोचले, त्यानंतर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी निवासस्थानातून पळ काढला. कोलंबो, गालेसह जवळपास सर्वच शहरांमध्ये वाईट परिस्थिती दिसून येत आहे. श्रीलंकेचे दिग्गज क्रिकेटपटूही देशातील जनतेच्या पाठीशी उभे राहिले आहेत.
माजी कर्णधार कुमार संगकाराने व्हिडिओ शेअर करत म्हटले की, 'हे आमच्या भविष्यासाठी आहे.' संगकाराचा सहकारी महेला जयवर्धनेनेही त्याचे ट्विट रिट्विट केले. दुसर्या ट्विटमध्ये जयवर्धनेने गोटाबाया राजपक्षे यांना #GoHomeGota वापरून पद सोडण्याचा सल्ला दिला आहे.
श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्या आंदोलकांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरला. सनथ जयसूर्याही कोलंबोतील राष्ट्रपती भवनाजवळ पोहोचला, तिथे आंदोलकांची गर्दी आहे. जयसूर्याने याबाबतचे काही फोटोही शेअर केले आहेत.
ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात गाले येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यातही आंदोलक दिसून आले आहेत. आंदोलकांनी स्टेडियमच्या बाहेर आणि आत पोस्टर फडकावून सध्याच्या परिस्थितीबद्दल आवाज उठवला आहे. मात्र, या सर्व गोष्टींचा सामन्यावर काहीही परिणाम झाला नाही आणि दोन्ही संघांमधील सामना अखंड सुरूच आहे.
राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे या संपूर्ण घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. विक्रमसिंघे पक्षाच्या नेत्यांसोबत तातडीची बैठक घेत आहेत आणि या संकटावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी चर्चा करत आहेत. त्याचवेळी विक्रमसिंघे यांनी संसदेचे अधिवेशन बोलावण्याचे आवाहन सभापतींना केले आहे. दुसरीकडे, गोटाबाया राजपक्षे यांच्यावर पायउतार होण्याचा दबावही वाढला आहे.