या देशात उरलं फक्त 1 दिवसाचं पेट्रोल, पंतप्रधान म्हणाले `येणारे दिवस आणखी कठीण`
भारताचा शेजारी देश श्रीलंका हा देश स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट आर्थिक टप्प्यातून जात आहे
Sri Lanka economic crisis: आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. देशात आता फक्त एक दिवस पुरेल इतकाच पेट्रोलचा साठा शिल्लक आहे. त्याच बरोबर देशात डिझेलचाही मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
नवनियुक्त पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी देशाला संबोधित करताना ही माहिती दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, आमच्याकडे फक्त एक दिवसाचा पेट्रोलचा साठा आहे आणि येणारे काही महिने आपल्या सर्वांसाठी खूप कठीण जाणार आहेत. प्रत्येकाने त्याग करण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि या काळात आव्हानांना सामोरे जाण्यासाठीही सज्ज राहिलं पाहिजे असं आवाहन त्यांनी देशवासियांना केलं.
पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून भाषण
रानिल विक्रमसिंघे यांनी देशाला उद्देशून भाषण केलं. आपला उद्देश कोणत्याही व्यक्ती, कुटुंब किंवा समूहाला वाचवणं नसून संकटात सापडलेल्या देशाला वाचवणे हे आहे, असं ते म्हणाले. श्रीलंकेच्या सागरी सीमेवरील पेट्रोल, कच्चं तेल, फर्नेस ऑइलच्या मालाची किंमत चुकवण्यासाठी खुल्या बाजारातून अमेरिकन डॉलर्स उभारले जातील, असं विक्रमसिंघे यांनी सांगितलं.
महिंदा राजपक्षे यांनी त्यांच्या समर्थकांनी सरकारविरोधी निदर्शकांवर हल्ला केल्यानंतर हिंसाचार उसळल्यानंतर पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर रानिल विक्रमसिंघे यांची श्रीलंकेचे 26 पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली.
दिलासा देणारा अर्थसंकल्प असेल
'देश वाचवणे हे माझे ध्येय आहे, मी येथे कोणत्याही व्यक्ती, कुटुंब किंवा समूहाला वाचवण्यासाठी पंतप्रधान झालेलो नाही, असं विधान विक्रमसिंघे यांनी केलं. 2022 चा अर्थसंकल्प देशाला दिलासा देणारा असेल असंही त्यांनी माहिती दिली. तोटयात चाललेल्या श्रीलंका एअरलाइन्सचं खाजगीकरण करण्याचा प्रस्ताव ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
2021 मध्येच श्रीलंका एअरलाइन्सला 45 अब्ज रुपयांचा तोटा झाल्याचं स्थानिक मीडियाने वृत्त दिलं आहे. 2022 मध्ये 31 मार्चपर्यंत त्यांचं एकूण 372 अब्ज रुपयांचे नुकसान झालं होतं.
श्रीलंकेवर आर्थिक संकट
1948 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्रीलंका सर्वात वाईट आर्थिक संकटातून जात आहे. परकीय चलनाच्या साठ्याच्या तीव्र टंचाईमुळे इंधन, स्वयंपाकाचा गॅस आणि इतर जीवनावश्यक वस्तूंसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यासोबतच प्रचंड वीज कपात आणि खाण्यापिण्याच्या वाढत्या किमतींमुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत.