भाडोत्री विद्यार्थ्याला 5 कोटी 88 लाख रुपये द्या! घरमालकाला कोर्टाचे आदेश; `ती` 1 चूक पडली महागात
Student Given 5 Crore Rs From Landlord: कॉलेजमध्ये शिकणारा हा विद्यार्थ्यी भाडेतत्वावर एका घरात राहत होता. मात्र अचानक असं काही घडलं की तो बेघर झाला आणि त्याला आता तब्बल दोन वर्षांनी न्याय मिळालाय. नेमकं घडलंय काय पाहूयात...
Student Given 5 Crore Rs From Landlord: घरमालकाने भाडेकरु म्हणून राहणाऱ्या विद्यार्थ्याला 5 कोटी 88 लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. संपूर्ण भाडं भरलेलं असतानाही घरमालकाने या विद्यार्थ्याला घराबाहेर काढल्याने कोर्टाने हा आदेश दिला आहे. 'पिपल मॅगझिन'ने दिलेल्या वृत्तानुसार, अँसेल पोस्टेल या तरुणाला कोर्टाने ही नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिलेत. या विद्यार्थ्याने घरमालकाविरोधात 2022 साली याचिका दाखल केली होती. कॅम्पस अॅडव्हानटेज या कंपनीच्या माध्यमातून अँसेल पोस्टेलने घर भाड्याने घेतलं होतं. कंपनीने या प्रकरणात कोर्टाने अँसेल पोस्टेलच्या बाजूने निकाल दिला आहे.
नक्की घडलं काय?
अँसेल पोस्टेल हा कोलम्बियाच्या बेनेटीक कॉलेजमध्ये शिकत होता. त्याला 11 जुलै 2022 रोजी घर भाड्याने देणाऱ्या 'द रोवॅन' कंपनीकडून एक ईमेल आला. पुढील दोन आठवड्यांमध्ये घर खाली कर असं अँसेल पोस्टेलला या ईमेलमधून सांगण्यात आलं होतं. या विद्यार्थ्याने हा ईमेल त्याच्या आईला पाठवला. त्यावर त्याच्या आईने द रोवॅनला मुलगा तिथेच राहणार असून त्याला अशी नोटीस पाठवण्याची गरज नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर अँसेल पोस्टेलच्या आईने 18 जुलै 2022 रोजी 3.20 लाख रुपये भाडं चेकच्या माध्यमातून 'द रोवॅन'ला दिला. मात्र अँसेल पोस्टेल 5 ऑगस्ट 2022 रोजी कोलम्बियाला परतला तेव्हा घरातील त्याचं सामान गायब असल्याचं दिसलं.
परस्पर हलवलं सामान
अँसेल पोस्टेलने त्याच्या आईला याबद्दल कळवलं असता त्यांनी 'द रोवॅन'कडे यासंदर्भात विचारणा केली. अँसेल पोस्टेलने केलेल्या तक्रारीनुसार त्याला न कळवता त्याचं सामान या भाड्याच्या घरातून चुकीच्या पद्धतीने हलवण्यात आलं. यामध्ये सामानाचं बरंच नुकसान झालं असंही अँसेल पोस्टेलने म्हटलं आहे. 'द रोवॅन'ने या नुकसानीच्या मोबदल्यात नुकसानभरपाई दिलं जाईल असं सांगितलं होतं. मात्र अशी कोणतीही रक्कम कुटुंबाला देण्यात आली नाही. अखेर त्यांनी 23 ऑगस्ट 2022 रोजी खटला दखल केला.
याचिकेत काय म्हटलं होतं?
दाखल केलेल्या याचिकेमध्ये अँसेल पोस्टेलला या प्रकरणामुळे झालेला मनस्तापाचा उल्लेख करण्यात आला आहे. या साऱ्या प्रकारामुळे अँसेल पोस्टेलला सुरुवातीचे काही दिवस लेक्चरलाही जाता आलं नाही. त्यामुळे त्याच्या शैक्षणिक कामगिरीवर परिणाम झाल्याचा उल्लेख याचिकेत आहे. या साऱ्यामुळे आपला अभ्यास न झाल्याने अनेक स्कॉलरशिपच्या शर्यतीमधून आपण बाहेर पडणार असल्याची चिंताही याचिकाकर्त्याने व्यक्त केलेली. या प्रकरणावर चार दिवस दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर अमेरिकेतील साऊथ कॅरलोना कोर्टाने अँसेल पोस्टेलला एकूण 7 लाख अमेरिकी डॉलर्सची नुकसानभरपाई देण्याचे आदेश घरमालकाला दिले आहेत.
मानले आभार
'द स्टेट'शी बोलताना अँसेल पोस्टेलने आपला खटल्यावर सुनावणी घेण्यास मंजुरी देताना माझी बाजू समजून घेत मला न्याय दिल्याबद्दल मी कोर्टाचे आभार मानतो, असं म्हटलं आहे.