सुसाईड बॉम्बरची ट्रेनिंग देणाऱ्याला तालिबानने बनवलं महत्त्वाच्या खात्याचा मंत्री
तालिबानने अफगाणिस्तानात सरकार स्थापनेची घोषणा केली आहे. या सरकारचे अनेक मंत्री त्यांच्या अत्यंत वादग्रस्त व्यक्तिचित्रांमुळे वादात आहेत.
मुंबई : तालिबानने अफगाणिस्तानात सरकार स्थापनेची घोषणा केली आहे. या सरकारचे अनेक मंत्री त्यांच्या अत्यंत वादग्रस्त व्यक्तिचित्रांमुळे वादात आहेत. असे काही नेते आहेत ज्यांच्यावर कोट्यवधींचे बक्षीस आहे, तर काहींना जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. तालिबानच्या मंत्रिमंडळात एक अशीच व्यक्ती आहे जो आत्मघाती बॉम्बर्स तयार करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र चालवत आहे.
ताज मीर जवाद असे या व्यक्तीचे नाव आहे. ताज मीर हा तालिबानच्या लष्करी व्यवस्थेतील महत्त्वाचा सदस्य मानला जातो. ताज मीरला उप गुप्तचर प्रमुख बनवण्यात आले आहे आणि तो गुप्तचर प्रमुख अब्दुल हक सोबत काम करणार आहे. अनेक सुरक्षा अधिकाऱ्यांनी ताज मीरबद्दल दावा केला आहे की त्याने गेल्या काही वर्षांत अनेक आत्मघाती हल्ले केले आहेत.
2018 मध्ये अफगाणिस्तानची गुप्तचर संस्था एनडीएसचे प्रमुख रहमतुल्ला नबील यांनी दावा केला की ताज मीर अल-हमजा ब्रिगेड नावाचे प्रशिक्षण केंद्र चालवतो जे आत्मघाती हल्लेखोरांना प्रशिक्षण देते. तालिबानच्या विरोधात शहीद झालेल्या अफगाणिस्तानचे पोलीस प्रमुख जनरल अब्दुल रझीक यांची हत्या करणाऱ्या आत्मघाती हल्लेखोराने ताज मीरच्या प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेतले होते, असेही नबील म्हणाले होते.
रिपोर्ट्सनुसार, ताज मीरने मुल्ला शिरीनसोबत पाकिस्तानच्या पेशावरमध्ये राहून जनरल अब्दुलला ठार करण्याची योजना बनवली होती. त्या कालावधीत बॉम्बचा प्रयोग केल्यामुळे ताज मीरही स्फोटात जखमी झाला होता, त्यानंतर आयएसआयने ताज मीरला पाकिस्तानी पासपोर्ट देऊन श्रीलंकेत पाठवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, तो यशस्वी होऊ शकला नाही, त्यानंतर ताज मीरवर कराचीमध्ये उपचार करण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे, जिहादी संघटनांचा मागोवा घेणाऱ्या लाँग वॉर जर्नल या वेबसाइटनुसार, 2013 पर्यंत ताज मीर हक्कानी नेटवर्कमधील वरिष्ठ कमांडरही होता. याशिवाय तो दाऊद नावाच्या व्यक्तीसोबत काबूल अटॅक नेटवर्क चालवत असे.
या नेटवर्कने वरदक, लोगार, नांगरहार, कपिसा, पक्तिका यासारख्या प्रांतांमध्ये अनेक हाय-प्रोफाइल हल्ले केले होते. अल-कायदा, लष्कर-ए-तैयबा, इस्लामिक मूव्हमेंट ऑफ उझबेकिस्तान, हिज्ब-ए-इस्लामी गुलबुद्दीन यासारख्या संघटनांनी काबूल अटॅक नेटवर्कद्वारे निर्देशित केलेल्या काही कारवायांमध्ये भाग घेतला.
केवळ ताज मीरच नाही तर याशिवाय तालिबानच्या अनेक मंत्र्यांचा धोकादायक गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. तालिबानचा गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी याला जागतिक दहशतवादी घोषित करत अमेरिकेने 37 कोटींचे बक्षीस ठेवले आहे. याशिवाय काही तालिबान मंत्री अमेरिकेच्या धोकादायक ग्वांतानामो कारागृहात कैदी होते.
उल्लेखनीय म्हणजे, ताईबुल कॅबिनेट मंत्री जसे खैरुल्ला खैरखवा (माहिती आणि संस्कृती मंत्री), अब्दुल हक (गुप्तचर प्रमुख), मुल्ला नुरुल्ला नूरी (सीमा आणि आदिवासी व्यवहार मंत्री) यांनी तुरुंगात शिक्षा भोगली आहे.