अंतराळात अडकून पडलेल्या सुनिता विल्यम्सची प्रकृती खालावली? जीवाला धोका? NASA म्हणते...
Sunita Williams Health News: अवघ्या आठ दिवसांच्या मोहिमेसाठी जून महिन्यामध्ये अंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर गेलेल्या सुनिता विल्यम्स या अंतराळयानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तिथेच अडकून पडल्या असून त्या थेट फेब्रुवारी महिन्यात परत येणार आहेत. असं असतानाच एक बातमी समोर आली आहे.
Sunita Williams Health News: अंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर (ISS) अडकून पडलेली भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचे नवीन फोटो समोर आले आहेत. हे फोटो पाहून अनेकांनी सुनिता विल्यम्स यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. असं असतानाच अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच 'नासा'ने सविस्तर तपशील जारी केला आहे. काही मीडिया पोस्टबरोबरच बातम्यांमध्ये सुनिता विल्यम्स यांची प्रकृती खालावल्याचे दावे करताना त्यांच्या जीवाला धोका असल्याचं सांगण्यात आल्यानंतर 'नासा'कडून विल्यम्स यांच्या प्रकृतीबद्दलचे अपडेट देण्यात आले आहेत. सध्या अंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर असलेल्या सर्व अंतराळवीरांबरोबर सुनिता विल्यम्स यांची तब्येत उत्तम आणि ठणठणीत आहे असं 'नासा'ने जाहीर केलं आहे. तसेच या सर्व अंतराळवीरांचं नियमित वैद्यकीय मूल्यमापन केलं जात असल्याचंही 'नासा'ने स्पष्ट केलं आहे.
नासाने एक पत्रकच जारी केलं
अमेरिकेत पार पडलेल्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर कसं वातावरण आहे यासंदर्भातील काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते. त्यानंतर सुनिता विल्यम्स यांच्या प्रकृतीसंदर्भात उलट सुलट चर्चा होऊ लागल्या. त्यांचे अंतराळातील आधीचे फोटो आणि नुकतेच समोर आलेले फोटो आजाबाजूला लावून शेअर करत अनेकांनी चिंता व्यक्त केली. त्यानंतर 'नासा'ने आपल्या अंतराळवीरांच्या विशेषत: सुनीता विल्यम्सच्या प्रकृतीचे अपडेट देणारे एक पत्रकच जारी केले आहे. अंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवरील सर्व अंतराळवीरांची विशेषज्ञ फ्लाइट सर्जनद्वारे आयोजित नियमित वैद्यकीय चाचणीला केली जाते. 'नासा'चे प्रवक्ते जिमी रसेल यांनीही अमेरिकेतील 'डेली मेल' या वृत्तपत्राशी बोलताना सर्व अंतराळवीरांची प्रकृती उत्तम आहे, असं सांगितलं.
काय दावे झाले?
काही प्रसारमाध्यमांनी सुनिता विल्यम्स यांचा अंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवरील मुक्काम वाढल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचा दावा केला गेला. अंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर विल्यम्स पेपरोनी पिझ्झा बनवतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात सुनिता विल्यम्स यांचे वजन फार कमी झाल्याचे आणि त्या खंगल्याचं दिसत होतं. विल्यम यांनी वजन कमी केल्याबद्दल चर्चा तेव्हापासून सुरू झाली होती. तसेच हे वजन कमी झालं आहे की केलं आहे याबद्दलही चर्चा झाली. सिएटल येथील एका पल्मोनोलॉजिस्टने फोटोचे विश्लेषण करताना म्हटले आहे की, विल्यम्स बारीक दिसू लागल्या आहेत. कदाचित त्या अंतराळामध्ये दीर्घकाळ असल्याने त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला असून त्यांना मानसिक तणाव जाणवत असेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. मात्र हे सर्व दावे 'नासा'ने खोडून काढले आहेत.
...अन् आठ दिवसांचा मुक्काम आठ महिन्यांचा झाला
सुनिता विल्यम्स आणि त्यांच्याबरोबर अंतराळात गेलेले त्यांचे सहकारी अंतराळवीर बॅरी विल्मोर हे केवळ 8 दिवसांच्या मोहिमेसाठी गेले होते. मात्र स्टारलाइनर अंतराळयानामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने या दोघांचा मुक्काम आठ महिन्यांनी वाढला. जून महिन्यामध्ये सुरू झालेली सुनिता आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मोहीम मूळ आठ दिवसांची होती. आता पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये या दोघांना एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्सच्या अंतराळयानाच्या मदतीने पृथ्वीवर परत आणण्याचा 'नासा'चा प्रयत्न आहे. स्टारलाइनर अंतराळयान पृथ्वीवर परत उतरत असताना त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण होऊन अपघाताची शक्यता वाटल्याने 'नासा'ने या दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्यासाठी घाई न करता सावधगिरीची भूमिका घेत त्यांचा अंतराळातील प्रवास अधिक वाढला तरी चालेल प्रवास सुरक्षितच झाला पाहिजे अशी भूमिका घेतली.