Coronavirus : 3 पैकी एका रुग्णाचा मृत्यू, कोरोनाचा `सुपर म्युटंट` माजवणार हाहाकार
ब्रिटीश वैज्ञानिकांचा इशारा
Coronavirus : जवळपास दीड वर्षांहून अधिक काळ झाला, तरीही कोरोनाचा (Coronavirus) कहर मात्र काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. त्यातच आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचाही धोका सर्वांना धडकी भरवत असताना सुपर म्युटंट हाहाकार माजवू शकतो असा इशारा वैज्ञानिकांकड़ून देण्यात आला आहे.
ब्रिटन सरकारच्या साइंटिफिक अडवाइजरी ग्रुप फॉर इमर्जेंसीज (SAGE) नं नोंदवलेल्या निरीक्षणानुसार कोरोनाचा नवा व्हॅरिएंट इतका घातक असेल की, त्यामुळे दर तीनपैकी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू ओढावू शकतो. परिणामी या नव्या व्हायरसमुळं मृत्यूदर 35 टक्क्यांवर पोहोचू शकतो.
बूस्टर वॅक्सिनची अतोनात गरज
एखादा व्हायरस अथवा विषाणू प्रदीर्घ काळासाठी राहिल्यास त्याच्या म्युटेशनचा धोका संभवतो. असंच काहीसं चित्र ब्रिटनमध्ये पाहायला मिळत आहे. वैज्ञानिकांच्या माहितीनुसार हिवाळा सुरु होण्यापूर्वी ब्रिटनमध्ये बूस्टर वॅक्सिन (Vaccine) आणणं गरजेचं असेल. शिवाय परदेशातून येणाऱ्या व्हायरसच्या नव्या व्हॅरिएंटला रोखण्यासोबतच काही जनावरांनाही मारावं लागू शकतं ज्यांच्यामध्ये हा व्हायरस राहू शकतो.
मृत्यूदर वाढण्याची भीती
वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार सुपर म्युटंट अतिशय धोकादायक ठरु शकतो. नवा व्हॅरिएंट बीटा, अल्फा आणि डेल्टा यांच्या मिश्रणातून तयार झालेला असल्यास तो लसींचा प्रभावही कमी करू शकतो ज्यामुळं मृत्यूदरात वाढ होण्याची भीती आहे. काही वैज्ञानिकांच्या मते लसीचा प्रभाव कमी करण्यासाठी व्हायरसही तितकाच प्रभावी असावा लागतो.
ब्रिटनमध्ये (Britain) एकिकडे सरकार लॉकडाऊनचे (Lockdown) नियम शिथिल करण्याच्या तयारीत असतानाच वैज्ञानिकांनी त्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अद्यापही विषाणूचा धोका कमी झाला नसल्यामुळं शासनानं अधिक सतर्क रहावं असंच वैज्ञानिकांचं मत आहे. शिवाय काही औषधांचा बेतानंच वापर करण्यात यावा असा इशाराही डॉक्टरांना वैज्ञानिकांनी दिला आहे.
काळजी घ्या! कोरोनाचा पुन्हा उद्रेक, या राज्यात 20 हजारांहून अधिक नवीन रुग्ण