कोरोना व्हायरसच्या लक्षणात वाढ, लहान मुलांमध्ये आढळली नवी लक्षणं
फक्त ताप आणि खोकला हीच कोरोनाची लक्षणे नाहीत
मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. देशभरात जवळपास ३७,३३६ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये १२१८ लोकांचा मृत्यू झाला आहे तर ९९५१ लोकं ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतीही लस शोधून काढण्यात आलेली नाही. पण कोरोनाची लक्षणे दिवसेंदिवस वाढत असल्याचं समोर येत आहे.
आतापर्यंत ताप, खोकला आणि थकवा ही कोरोनाची महत्वाची लक्षणे होती. पण आता युरोपमध्ये डॉक्टरांना कोरोनाबाधित रूग्णांमध्ये आणखी काही नवीन लक्षणे आढळली आहेत. कोरोनाबाधित रूग्णांची वास घेण्याची क्षमता कमी झाली अथवा पूर्णपणे गेली आहे. एवढंच नव्हे आता समोर आलेली माहिती आणखी धक्कादायक आहे.
युरोपीय डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधित रूग्णांचया पायावर लहान लहान चट्टे दिसल्याचे आढळले. पायावर जांभळ्या रंगाचे डाग दिसून आले आहेत.
स्पेनच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसचा परिणाम पायावर देखील झाल्याचं दिसून येत आहे. पायाच्या चामडीवर जखम होत असून याचा रंग जांभळ्या रंगाचा पट्टा दिसतो. महत्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे ही लक्षणे लहान मुलं किंवा नवजात शिशुंमध्ये आढळून आली आहेत. तर काही डॉक्टरांनी अशी माहिती दिली की, हे व्रण कांचण्यांप्रमाणे दिसतात.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत अद्याप कोणताच रिसर्च झालेला नाही. मात्र डॉक्टरांनी सावधान राहण्यास सांगितलं आहे. लहान मुलांची आणि नवजात बाळकांची सर्वात जास्त काळजी घेणं गरजेचं आहे.