काबुल : अफगाणिस्तान (Afghanistan) ताब्यात आल्यानंतर तालिबानने (Taliban) नवीन सरकार स्थापनेची घोषणा केली आहे. नव्या सरकारच्या स्वरूपाची माहिती देताना तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद म्हणाले, मुल्ला हसन अखुंद (Mullah Mohammad Hassan Akhund) हे पंतप्रधान आणि मुल्ला अब्दुल गनी बरदार (Mullah Abdul Ghani Baradar) हे उपपंतप्रधान असतील. अमीर मुक्ताकी परराष्ट्र मंत्री आणि सिराजुद्दीन हक्कानी गृहमंत्री असतील. तसेच मुल्ला याकूब संरक्षण मंत्री असतील. उर्वरित मंत्र्यांची नावे लवकरच जाहीर केली जातील.


दोन उपपंतप्रधान असणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन तालिबान सरकारमध्ये दोन उपपंतप्रधान असतील. मुल्ला बरदार व्यतिरिक्त मुल्ला अब्दुल सलाम हनफू (Mullah Abdul Salam Hanfu) हे उपपंतप्रधानही असतील. खैरुल्ला खैरख्वा (Khairullah Khairkhwa) माहिती मंत्री, अब्दुल हकीम (Abdul Hakim) न्याय मंत्री, शेर अब्बास स्टॅनिकझाई (Sher Abbas Stanikzai) परराष्ट्र खात्याचे उपमंत्री, झबीउल्लाह मुजाहिद माहिती उपमंत्री, अमीर खान मुत्ताकी परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि मुल्ला हिदायत बद्री अर्थमंत्री असतील.


चांगल्या सरकारसाठी प्रयत्न


तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद म्हणाले, आम्ही चांगल्या सरकारसाठी प्रयत्न करत आहोत. जोपर्यंत आम्हाला पात्र मंत्री मिळत नाहीत, तोपर्यंत याच नावांवर निर्णय घेण्यात आला आहे, उर्वरित मंत्र्यांची नावे लवकरच जाहीर केली जातील. आम्ही चांगलं आणि अचूकपणे कार्य करू. आमचं धोरण स्पष्ट आहे.


पाकिस्तानची भूमिका काय?


पाकिस्तानच्या भूमिकेवर स्पष्टीकरण देताना तालिबानचे प्रवक्ते म्हणाले, 'काही लोकांना वाटते की पाकिस्तानचा हस्तक्षेप आहे, पण ती फक्त एक अफवा आहे. आम्ही कोणत्याही देशाला हस्तक्षेप करू देणार नाही. आम्ही स्वतंत्रपणे काम करू. आम्ही अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं आहे. आता आम्हाला सर्व देशांशी चांगले संबंध हवे आहेत. तूर्तास आम्ही काळजीवाहू सरकारची घोषणा केली आहे, ही घोषणा अंतिम नाही. आम्हाला हे देखील माहित आहे की काही लोकांना अनुभव नाही.


पंजशीरमध्ये युद्ध झालं नाही


आता पंजशीरमध्येही आमचं शासन आहे, पंजशीर प्रांत पूर्णपणे सुरक्षित आहे. तालिबाननं सांगितलं की तिथे कोणतंही युद्ध झालं नाही, असं तालिबान प्रवक्त्याने म्हटलं आहे.